आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दुग्ध'शर्करा योग:योगायोगाने पारोळा तालुक्यात दिंडीची भेट झाली बाळू मामांच्या रथाला

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल तालुक्यातील चिंचोली येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर यांच्यावतीने यंदा सलग 19 व्या वर्षी पालखीसह पायी दिंडी काढण्यात आली. ही दिंडी तीसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी पाराेळा तालुक्यातील सावदा येथे आली होती. योगायोगाने सावदा गावात काही दिवसांपासून नवागाव (ता. साक्री, धुळे) येथील बाल सेवेकरी मंडळाची बाळू मामांचा रथ मुक्कामी आहे. देवमेंढ्यांचा कळप असलेल्या या मानाच्या रथाची सेवा सावाद्याचे नागरिक करीत आहेत. अशात शुक्रवारी यावलची दिंडी गावात आली. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग भाविकांना अनुभवास मिळाला. राज्याच्या संत परंपरेतील महान संत म्हणून बाळू मामांना स्थान आहे. त्यामुळे सावदा गावात चैतन्य निर्माण झाले होते.

चिंचोली येथील रामचंद्र महाराज, विष्णू महाराज, महादेवनाथ महाराज यांच्यानंतर ऋषिकेश महाराज संस्था सांभाळत आहेत. यावल तालुक्यातील लोकांना पायी वारीत सहभागी होण्यासाठी इतर गावांमध्ये जावे लागत होते. तेथील दिंड्यांसोबत हे लोक पंढरपूरला जायचे. त्यामुळे या लोकांना तालुक्यातूनच ही सुविधा मिळावी म्हणून ऋषिकेश महाराज यांनी 19 वर्षांपासून या वारीला सुरुवात केली आहे. 250 वारकऱ्यांचा ताफा शुक्रवारी पारोळा तालुक्यातून भडगावकडे वळला. यात मृदुंगाचार्य विशाल महाराज, शिवदास महाराज, गायनाचार्य नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांचाही सहभाग आहे. पायी चालत असताना अखंडपणे भजन, किर्तन, विठ्ठलाचा नामजाप सुरू आहे.

देवमेंढ्यांना प्रचंड मान

शुक्रवारी बाळू मामांचा रथाचीही सेवा करण्याची संधी वारकऱ्यांना मिळाली. सेवेकऱ्यांनी रथाचे दर्शन घेऊन माथ्यावर भंडारा लावला. यानंतर अनेकांनी मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी देवमेंढ्यांच्या कानात इच्छा बोलून दाखवली. यानंतर मेंढ्यांच्या कळपांना पाच प्रदक्षिणा घातल्या. एकाचवेळी समोर आलेल्या या दोन प्रसंगांमुळे वारकरी सांप्रदायाची भक्तीमय प्रचिती समोर आली. सकाळी 10.30 वाजता रथाच्या आरतीतही वारकऱ्यांनी सहभाग घेतला. शिंग असलेल्या देवमेंढ्यांना प्रचंड मान आहे. त्यांचेही दर्शन घेता आले. यानंतर यावलची दिंडी मार्गस्त झाली.

बातम्या आणखी आहेत...