आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका प्रशासनाचे नेतृत्व नेमके काेणाच्या हाती या प्रश्नाने संपूर्ण महापालिका कर्मचाऱ्यांना बुचकळ्यात टाकले आहे. बदलीला स्थगिती मिळाल्याने डाॅ. विद्या गायकवाड पदस्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत. तर शासनाने नियुक्ती केलेले देविदास पवार दाेन दिवसांपासून पालिकेत फिरकले नाहीत. फाइलींच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेले अधिकारी केवळ चकरा मारत आहेत. अशा परिस्थितीत आयुक्त गेले कुणीकडे, शाेध घेताय चाेहीकडे असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
आयुक्त डाॅ. विद्या गायकवाड यांच्या बदलीचे आदेश हाेताच दुसऱ्याच दिवशी बुधवारी देविदास पवार यांनी जळगाव गाठत पदभार स्वीकारला. त्याच्या दुसऱ्या दिवशी डाॅ. गायकवाड यांनी मॅटमध्ये धाव घेत बदलीला स्थगिती मिळवली. तसेच शुक्रवारी आयुक्त पवार यांना मॅटच्या आदेशाची प्रतही दिली; परंतु त्यानंतरही पवार यांनी साेमवारी सकाळी लाेकशाही दिनी हजेरी लावली; मात्र दुपारी १२.३० वाजेनंतर आयुक्त पवार मनपातून बाहेर पडले ते मंगळवारी सायंकाळपर्यंत दाखल झाले नव्हते. एकीकडे गायकवाड मनपाची सूत्रे स्वीकारण्यासाठी सज्ज आहेत तर दुसरीकडे पवार हातात सूत्रे असतानाही कामाला गती देत नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, आयुक्त पवार यांच्याशी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
शुक्रवारी फैसला हाेणार डाॅ. गायकवाड यांनी मॅटमध्ये धाव घेत बदललीला स्थगिती मिळवली आहे. यासंदर्भात ९ राेजी सुनावणी हाेणार आहे. यात शासनाकडून भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. त्यात काय निर्णय लागताे यावर मनपाचा आयुक्त काेण असेल हे ठरेल. दरम्यान, मनपा पदाधिकाऱ्यांसाेबत मक्तेदारांमध्येही याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
अधिकाऱ्यांची काेंडी डाॅ. विद्या गायकवाड ह्या पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने दाेन दिवसात आयुक्तांकडे २२ फाइली मंजुरीसाठी दाखल झाल्या; परंतु त्या पुन्हा येईपर्यंत त्यांची बदली झालेली हाेती. त्यानंतर आयुक्त पवार यांनी पदभार घेतल्यापासून आतापर्यंत १९ फाइलींची नाेंद झाली. पवार हे साेमवारी दुपारनंतर कार्यालयात परतले नसल्याने अधिकाऱ्यांची काेंडी झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.