आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील कोटेचा महिला महाविद्यालयात शिक्षकांची बोगस भरती करण्यात आल्याची तक्रार, श्री सरस्वती प्रसारक मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शालिग्राम न्याती यांनी भुसावळ शहर पोलिसांकडे केली आहे. या संदर्भात दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कोटेचा महाविद्यालयात नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत बनावट दस्तऐवज तयार करून महेश अरविंद चौधरी व रुकसाना बी.ताजम्मुल हुसेन यांची वाणिज्य शिक्षक म्हणून शिक्षण सेवक पदावर भरती केली. संस्थाचालकांना अधिकार नसताना त्यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले.
राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडे कागदपत्रे सादर करून संंबंधितांनी वेतन लाटले. विशेष म्हणजे २०१४ ते २०२२ या सात वर्षांच्या कालावधीत संबंधित कर्मचारी महाविद्यालयात उपस्थित राहिले नाहीत. मात्र त्यांना हजर दाखवण्यात आले. रुकसानाबी या २०१३ ते २०२१ दरम्यान ताप्ती स्कूलमध्ये तर महेश चौधरी हे ठाण्यातील एका शाळेत कार्यरत होते. २०१७ व २०१९ या बिंदू नामावली तपासणी अहवालात ही पदे रिक्त दर्शवल्याने, प्राचार्यांनी शिक्षक भरती केली नाही हे दिसून येते. मात्र बनावट नियुक्तीपत्राद्वारे नियुक्त्या करून शासनाची फसवणूक करण्यात आली असून, अनुदानही लाटल्याचा आरोप न्याती यांनी केला. या प्रकरणी पोलिसांत न्याती यांनी तक्रार अर्ज दिला आहे. मात्र अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.
मला भाष्य करायचे नाही
या प्रकरणाबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मला याबाबत भाष्य करायचे नाही, असे सांगून अधिक बोलणे टाळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.