आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हल्लाबोल:‘फडणवीसांचे कारस्थान’ पुराव्यानिशी सांगणार, माझे राजकीय जीवन संपवण्याचा घाट : भाजप नेते एकनाथ खडसेंचा थेट हल्ला

मुक्ताईनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लवकरच ‘नानासाहेब फडणवीसांचे कारभाई कारस्थान’ हे पुस्तक येत आहे

माझे ४० वर्षांचे राजकीय जीवन संपवण्याचा घाट घातला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच मला त्रास झाला हे आज जाहीरपणे नाव घेऊन सांगतो आहे, असा थेट हल्लाबोल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मुक्ताईनगरात केला.

आपल्या राजकीय हाडवैऱ्याचे कारस्थान एका पुस्तकाच्या माध्यमातून सांगणार असल्याचे ते म्हणाले. अन्य पक्षांकडून आमदार-मंत्रिपदाची ऑफर होती, पण मी पक्ष सोडला नाही. काहीतरी अडकले म्हणून नाथाभाऊ पक्ष सोडत नाहीत असे लोक म्हणतात. पण ज्या पक्षाच्या उभारणीसाठी ४० वर्षे घालवली तो पक्ष सोडू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा. डॉ. सुनील नेवे लिखित “जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी खडसे फार्म येथे झाले. त्या वेळी खडसे यांनी खदखद व्यक्त केली. ते म्हणाले, फडणवीस (अंजली) दमानियांना भेटण्यासाठी वेळ देत, पण मला भेटण्यासाठी वेळ देत नव्हते. हॅकर मनीष भंगाळेला अटक करा, असे लेखी पत्र देऊनही अटक केली नाही. पक्षासाठी योगदान असताना माझ्यासह चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांचेही तिकीट कापले. यामुळे पक्षाच्या जागा कमी आल्या, सरकार गेले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर आज हयात असते तर चित्र वेगळे असते. जोपर्यंत पक्षाकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत श्रेष्ठींकडे भांडत राहीन, असेही ते म्हणाले.

लवकरच नवीन पुस्तक
आठ दिवसांपासून या पुस्तकाबाबत उत्सुकता आहे. मात्र, तुमच्या मनात ज्याविषयी उत्सुकता आहे ते या पुस्तकात नाही. लवकरच ‘नानासाहेब फडणवीसांचे कारभाई कारस्थान’ हे पुस्तक येत आहे. त्यात पुराव्यानिशी सर्व तथ्ये मांडेन, असे खडसे म्हणाले. जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांनी पुरावे आणून दिल्याचे सांगून आजवर उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.