आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष बदलाच्या विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिंदे गटात राजकारण चांगलेच तापले आहे. दाेन्ही पक्षांत विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या राजीनाम्यापूर्वीच इच्छुकांनी माेर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे दाेन्ही पक्षातील गट-तटांचे राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्हा बँकेतील सत्ता फाॅर्म्युल्यात राष्ट्रवादीला तीन वर्षे अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. या संधीत पहिले एक वर्ष संपल्यानंतर आता दुसऱ्या संचालकाला अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे.
अध्यक्षपदासाठी माजी मंत्री डाॅ. सतीश पाटील, संजय पवार आणि अॅड. रवींद्र पाटील या तिघांची नावे चर्चेत आहेत. विधानसभेचे विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार आमदार एकनाथ खडसे यांना दिले आहेत. त्यामुळे आमदार खडसे या तिघांपैकी कुणाच्या नावाची शिफारस करणार की दुसऱ्याच नावावर शिक्कामाेर्तब करणार? याबाबत पक्षात उत्सुकता आहे. ६ फेब्रुवारी राेजी अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे एक बैठक बाेलावून नवीन अध्यक्षांचे नाव त्यात निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेत शनिवारी झालेल्या संचालकांच्या बैठकीमध्ये अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याकडे राजीनामा मागण्यात आला हाेता. साेमवारी ते जिल्हा उपनिबंधकांकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सहकार विभागाकडून अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर जाईल. त्यानंतर राजकीय घडामाेडींना अधिक वेग येईल.
शिंदेगटाच्या बैठकीकडे लक्ष : जिल्हा बँकेत शिवसेनेच्या वाट्याला उपाध्यक्षपद असून, या वर्षासाठी पक्षाच्या दुसऱ्या संचालकाला संधी दिली जाणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उपाध्यक्षपदासाठी पाचाेऱ्याचे आमदार किशाेर पाटील हे प्रताप हरी पाटील यांच्यासाठी आग्रही आहेत. तर गेल्या वर्षी उपाध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदारी केलेल्या अमाेल पाटील यांच्यासाठी पाराेळ्याचे आमदार चिमणराव पाटील हे आग्रह करू शकतात.
महापाैर जयश्री महाजन या उद्धव ठाकरे गटात राहिल्याने त्यांना संचालकांच्या संख्येने अधिक असलेल्या शिंदे गटाकडून संधी मिळण्याची शक्यता नाही. शिंदेगटातील काेणाला संधी द्यायची याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा काैल महत्त्वाचा राहणार आहे. उपाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर शिंदेगटाची उमेदवार निश्चितीसाठी बैठक हाेईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.