आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश:कोरोनाचे निर्बंध हटवले, हॉटेल्स, बार रात्री 10 नंतरही खुले राहणार; आता सर्वच कार्यक्रम दणक्यात

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोवीड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने पारित करण्यात आलेले सर्व आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मागे घेतले आहेत. अर्थात, जिल्हा आजपासून खऱ्या अर्थाने निर्बंधमुक्त झाला असून हॉटेल्स, बार रात्री १० नंतरही खुले राहतील.

जिल्ह्यातील सर्व नागरिक, आस्थापना व घटक यांनी आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षिततेसाठी कोविड अनुरूप वर्तनासाठी चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मार्च २०२०पासून महाराष्ट्रात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत निर्बंध लागू करण्यात आलेले होते.

बाधित रुग्णसंख्येत घट झालेली असून, काही आठवड्यांपासून बाधित रुग्णांची संख्या प्रती दिवसाच्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी व बेड क्षमता या बाबी लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत लागू केलेले निर्बंध शिथिल केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध १ एप्रिलपासून काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत निर्बंधाबाबत लागू केलेले सर्व आदेश मागे घेण्यात आले आहेत.

नाट्यगृह, चित्रपटगृहांना प्रवेश क्षमतेचे बंधन नाही
आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी ४ मार्चनंतर निर्बंधांबाबत आदेश काढलेला नाही. या आदेशानुसार सामाजिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय सभा, सण, उत्सव, लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर प्रकारच्या गर्दीच्या कार्यक्रमांना जागेच्या ५० टक्के क्षमतेच्या आत किंवा २०० लोकांची मर्यादा होती.शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट, बार, स्पोर्ट‌्स कॉम्प्लेक्स, धार्मिक स्थळे, नाट्यगृहांना ५० टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याचे आदेश होते. उपस्थितीसाठी लसीकरण बंधनकारक होते. या सर्व निर्बंधातून जिल्हा आजपासून मुक्त झाला. वेळोवेळी काढण्यात आलेले सर्व आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मागे घेतले आहेत आता सर्व सार्वजनिक कार्यक्रम दणक्यात करता येतील.

बातम्या आणखी आहेत...