आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Corona RTPCR Negative Report | Jalgaon | Marathi News | Negative Report Of 'RTPCR' Is Available At District Hospital For Rs. 300 Without Examination

दिव्य मराठी स्टिंग:जिल्हा रुग्णालयात 300 रुपयांत मिळतो तपासणी न करताच ‘आरटीपीसीआर’चा निगेटिव्ह अहवाल

विजय राजहंस, चंद्रकांत पाटील | जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तपासणी न करताच तुम्हाला कोरोनाचा आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल तातडीने हवा आहे का? त्यासाठी थोडे पैसे खर्च करायची तयारी आहे का? मग चिंता करू नका!

तुम्हाला तपासणी न करताच कोरोनाचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट तातडीने हवा आहे का? मग तुमच्या आधार कार्डचा फोटो काढा आणि विशिष्ट क्रमांकावर तो पाठवून द्या. वर ४०० रुपये द्या आणि दोन तासांत कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल ताब्यात घ्या. हो. हे खरे आहे. ‘दिव्य मराठी’ने अशाप्रकारे चार अहवाल मिळवले असून, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात चालणारा हा समाजघातकी ‘धंदा’ उघडकीस आणला आहे.

कोरोनाचा प्रसार होऊन समाजाची हानी होऊ नये म्हणून प्रवास वा अन्य कारणासाठी आरटीपीसीआर चाचणी करवून घेण्याची सक्ती अनेक ठिकाणी केली जाते. ज्यांचा अहवाल नकारात्मक येतो त्यांनाच परवानगी दिली जाते. ज्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह येतो त्यांना विलगीकरणाचा सल्ला दिला जातो. त्यामुळे काेरोनाचा संसर्ग रोखला जाणे शक्य होते; पण शासनाच्या या प्रयत्नांनाच हरताळ फासून स्वत:चे उखळ पांढरे करवून घेण्याचा उद्योग जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुरू आहे. त्यासाठी शासकीय यंत्रसामग्रीचाच गैरवापर सुरू असून, रोज किती जणांना असे निगेटिव्ह अहवाल दिले जातात? त्यातले किती जण प्रत्यक्षात पाॅझिटिव्ह असतात याचा थांग लावण्याची जबाबदारी आता संबंधित प्रशासनावर आहे.

सुरक्षारक्षकच बनलाय भक्षक
जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक एकवर प्रशासनाने सुरक्षारक्षक बसवले आहेत. त्यातला राजू पाटील (दुर्गे) असला ‘उद्योग’ करीत असल्याचे ‘दिव्य मराठी’ टीमने प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्याला मंगळवारी एका अहवालासाठी चारशे रुपये देण्यात आले होते. त्यानंतर त्याला असे एकूण ५० अहवाल मिळवायचे आहेत, असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर त्याने एकाशी फोनवर चर्चा करून रोज १० अहवाल मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मोठे गिऱ्हाईक असल्यामुळे ४०० रुपयांचा दर कमी करून ३०० रुपये करण्यात आला. त्या दरानुसार बुधवारी तीन अहवालांसाठी ९०० रुपये आणि तिघांच्या आधार कार्डांची झेराॅक्स देऊन अवघ्या दोन तासांत त्याच्याकडून निगेटिव्ह अहवाल मिळाले.

व्हीआयपींना लागले होते पाच तास
माजी मंत्री एकनाथ खडसे आणि पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांचा अहवाल तातडीने मिळवण्यात आला होता. मात्र तो मिळायला त्यांनाही किमान पाच तास कालावधी लागला होता. मात्र, जिल्हा रुग्णालयातील या साखळीने अवघ्या दोन तासांत अहवालाचे खरे कागद हातात ठेवले आहेत.

व्हाॅट‌्सअॅपवर फोटो पाठवूनही होते काम
दरम्यान, तुम्हाला जर ५० जणांचे अहवाल मिळवायचे आहेत त्यासाठी प्रत्यक्ष फोटोकाॅपी घेऊन इथे येण्याची काहीच गरज नाही, असेही राजू पाटील याने प्रतिनिधीला सांगितले. आपला व्हाॅट‌्सअॅप क्रमांक घ्या आणि त्यावर आधारकार्डचा फोटो पाठवला तरी चालेल. पैसे एकदम द्या, असा मार्गही सुरक्षारक्षक राजू पाटील याने सुचवला आहे.

अनेक जणांचा सहभाग शक्य

सुरक्षा रक्षक राजू पाटील दुर्गे याच्याकडे आधारकार्ड दिल्यानंतर तो ‘क’ या नावाने संग्रही केलेल्या क्रमांकावर बोलतो आणि किती वाजता अहवाल घेण्यासाठी बोलवायचे हे विचारतो हा अनुभव ‘टीम दिव्य मराठी’ने दोन्ही दिवस घेतला. ५० जणांचे अहवाल एकाच दिवशी मिळतील का? त्यासाठी दर कमी करून मागत असल्याने किती कमी करून सांगायचे? याबाबतही त्याने अशीच चर्चा केली. (त्याची ध्वनिफीत आणि ध्वनिचित्रफीतही चित्रित करण्यात आली आहे.) त्यावरून या कामात राजू पाटील हा एकटा नसून अहवाल बनवण्याच्या प्रक्रियेतील आणखीही काेणी सहभागी असल्याचे समोर आले आहे. ती व्यक्ती कोण याचा मात्र तपास लागला नाही. त्या व्यक्तीला शोधण्याचे काम आता प्रशासनाचे आहे.

दोन तासांत अहवाल
आरटीपीसीआर तपासणीचे जे अहवाल प्राप्त झाले आहेत त्यात एकाचे सॅम्पल लॅबला दुपारी दोन वाजून ५० मिनिटांनी मिळाल्याचे नोंदवण्यात आले असून अहवाल दिल्याची वेळ चार वाजून ५८ मिनिटांची आहे. म्हणजे अवघ्या दोन तास आठ मिनिटांतच अहवाल ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींना प्राप्त झाला आहे.

प्रक्रिया पूर्ण हाेण्यासाठी किमान लागतात अडीच तास
कितीही तातडीने अहवाल पाहिजे असेल तरीही प्रक्रिया पूर्ण व्हायला कमीत कमी अडीच तास लागतात आणि संबंधितांपर्यंत अहवाल जायला किमान साडेचार तास लागतात, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील प्रमुख डाॅ. किशोर इंगोले यांनीच ‘दिव्य मराठी’ला दिली आहे. प्रत्यक्षात मात्र दोन तास आठ मिनिटांतच सही आणि शिक्क्यानिशी अहवाल ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधींना प्राप्त झाला आहे. त्यावरील क्यूआर कोडवरून चिकित्सकपणे तपासणी केली असता तो खरा असल्याची माहिती इंटरनेटवरून प्राप्त होते आहे.

‘सिव्हिल’मध्ये असे केले स्टिंग
मंगळवारी एक प्रमाणपत्र मिळवताना राजू पाटीलशी झालेल्या ओळखीचा लाभ बुधवारी घेण्यात आला. दोन फेब्रुवारीला दिव्य मराठी कार्यालयातीलच तीन कर्मचाऱ्यांना आॅपरेशनमध्ये सहभागी होण्यासाठी विश्वासात घेण्यात आले. त्यांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या आधार कार्डांची फोटोकाॅपी घेण्यात आली. त्या फोटाेकाॅपी दुपारी १.४० वाजता राजू पाटीलकडे दिल्या. अग्रीम म्हणून प्रत्येकी १०० असे तीनशे रुपये देण्यात आले. सायंकाळी सात वाजता अहवाल मिळेल, असे त्याने सांगितले. त्यावर इतक्या लांबून पुन्हा यावे लागेल. त्यापेक्षा इथे थांबतो. लवकर मिळवून द्या, अशी विनंती त्याला केली.

त्याने त्याच्या मोबाइलमध्ये ‘क’ नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकावर संपर्क केला व साडेचार वाजता यायला सांगितले. त्यावेळी तिथे गेल्यावर २० मिनिटांनी म्हणजे पाच वाजता ६०० रुपये घेऊन राजू पाटील याने तिन्ही रिपोर्ट हातात सोपवले. परराज्यात परीक्षेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला तातडीने अहवाल पाहिजे होता. मात्र, आज तपासणी केली तर उद्या अहवाल मिळेल असे त्याला सांगण्यात आले. मात्र, तातडीने आणि तोही निगेटिव्ह अहवाल हवा असेल तर गेट क्रमांक एकवरील राजू पाटील नामक सुरक्षा रक्षकाला भेटावे, असे त्याला सांगण्यात आले. ही माहिती मिळताच ती व्यक्ती ‘दिव्य मराठी’ कार्यालयात आली. जिल्हा रुग्णालयात असे उद्योग सुरू आहेत, त्याविरुद्ध आवाज उठवावा, अशी विनंती तिने केली. त्यानंतर स्टिंग आॅपरेशन करायचे असा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी एक आधारकार्ड देऊन अहवाल मिळवण्यात आला. त्यासाठी पाच तासांपेक्षा अधिक वेळ लागला. बुधवारी तर दोन तासांत तीन अहवाल मिळाले.

बातम्या आणखी आहेत...