आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी चिंताग्रस्त:अतिपावसामुळे कपाशीचा तळमजला रिकामा; मोठ्या प्रमाणात गळ सुरू

ममुराबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर आता थोडा कमी झाला आहे; मात्र आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे विशेषतः पूर्वहंगामी उन्हाळी कपाशीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. अतिपावसात जमिनीलगतची पाने मोठ्या संख्येने गळाल्याने कपाशीचा तळमजला अक्षरशः रिकामा झाला आहे.

सततच्या पावसामुळे जमिनीतील वाफसा स्थिती अभावी उन्हाळी कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात पिवळे पडले होते. यथावकाश पावसाचा जोर कमी झाल्याने कपाशीची स्थिती आता सुधारताना दिसत आहे; परंतु अति पावसामुळे खालची बहुतांश पाने गळून गेल्याने कपाशीचे पीक वरच्या अंगाने चांगले हिरवे आणि खालून एकदम खट्टे झाले आहे. खालच्या बाजूने पानेच शिल्लक न राहिल्याने कपाशीचे पीक आरपार मोकळे दिसू लागले असून, पात्या व फुलांचा कोठेच पत्ता राहिलेला नाही. साहजिक पहिल्या बहारातून मिळणे अपेक्षित असलेल्या कापसाच्या उत्पादनाची आशाही फोल ठरली आहे. साधारण दसऱ्यानंतर शेतकऱ्याच्या घरात पहिल्या वेचणीचा कापूस येतो. अति पावसामुळे त्यावर पाणी फेरल्याने आता सर्व भिस्त दुसऱ्या बहारावरच आहे. कापसाच्या एकूण उत्पादनावर त्याकारणाने काहीअंशी परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे.

फुलपात्यांची गळ थांबवण्यासाठी फ्लॅनोफिक्स फवारा
सततच्या पावसामुळे काही ठिकाणी कपाशीची पाने, पात्या व फुलांची गळ होत आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्लॅनोफिक्स १५ लिटर पाण्यात ५ मिली घेऊन फवारणी करावी. तसेच रासायनिक खतांचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा.

शेतात पावसाचे पाणी साचल्यास चर काढावेत किंवा पाण्याचा ताण पडल्यास सिंचनाची सोय करुन जमिनीची वाफसा स्थिती कायम राखावी. जेणेकरुन पात्या व फुलांची गळ नियंत्रणात येईल, असे कापूस पैदासकार डाॅ. गिरीश चौधरी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...