आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी उत्पादन:राज्यात कापसाच्या उत्पादनात तब्बल 30, तर ज्वारीत 55 टक्के घट

जळगाव | प्रदीप राजपूत7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगले पर्जन्यमान हाेऊनही यंदा महाराष्ट्रात कृषी उत्पादन कमालीचे घटले आहे. जागतिक बाजारात सर्वाधिक उच्चांकी पातळीवर असलेल्या कापसाचे राज्यातील उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी घटले आहे. तर प्रमुख पीक असलेल्या ज्वारीच्या उत्पादनात ५५ टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात एकूण अन्नधान्याचे उत्पादन १४ टक्क्यांनी घटल्याची चिंताजनक माहिती राज्याच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आली आहे. उत्पादन घटल्याने कृषी विकासदर अवघ्या ४.४ टक्क्यांवर आला आहे.

काेराेना काळात अर्थव्यवस्थेला तारणाऱ्या कृषी क्षेत्राचा विकासदर वर्षभरात ११.७ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. जागतिक बाजारात उच्चांकी पातळीवर असलेल्या कापसाचे महाराष्ट्रातील उत्पादन ३० टक्क्यांनी घटले आहे. यावर्षी कापसाचे राज्यातील लागवड क्षेत्र १३ टक्क्यांनी. मागील वर्षी ४५ लाख हेक्टर कापसाचे क्षेत्र यंदा ३९ लाख ५४ हजार हेक्टरपर्यंत खाली आले आहे. तर उत्पादन सरासरी १०१ लाख कापूस गाठींवरून (प्रतिगाठ १७० किलाे) ७१ लाख १२ हजार गाठींपर्यंत खाली आहे. एकूण कापूस उत्पादनात ३० टक्क्यांनी घट झाली आहे. कापसाची (रुई) प्रतिहेक्टरी उत्पादकता इतर राज्यांच्या तुलनेत केवळ २५२ किलाे प्रतिहेक्टर एवढी कमी झाली आहे. मागील वर्षी राज्यातील कापसाची प्रतिहेक्टरी उत्पादकता ३७८ किलाे एवढी हाेती. यंदा ती घटल्याने त्याचा थेट परिणाम कापसाचे उत्पादन घटण्यावर झाला आहे.

तृणधान्य व कडधान्याचे उत्पादन १४ टक्के घटले
राज्यात प्रमुख पीक असलेल्या ज्वारीचे उत्पादन सर्वाधिक ५५ टक्के घटले आहे. बाजरीच्या उत्पादनात देखील ४९ टक्क्यांची घट आली आहे. मका, नाचणी, तांदूळसह एकूण तृणधान्याच्या उत्पादनात ११ टक्क्यांची घट झाली आहे. तूर ३४ तर मुगाचे उत्पादन १२ टक्क्यांनी घटले आहे. कडधान्याच्या उत्पादनात २७ टक्क्यांची घट आहे. तृणधान्य आणि कडधान्य मिळून एकत्रित अन्नधान्याचे उत्पादन १४ टक्क्यांनी घटल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

रब्बीतही उतरता आलेख
राज्यात यंदा रब्बीचे पेरणी क्षेत्रही १० टक्क्यांनी कमी झाले आहे. एकूण ५२.४७ लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र आहे. रब्बीतील ज्वारीचे उत्पादन २५ टक्के तर गव्हाचे उत्पादन २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. एकूण रब्बी तृणधान्य उत्पादनात २१ टक्के घट अपेक्षित आहे.

हरभरा तारणार
रब्बीत हरभरा उत्पादनात १५ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. कडधान्यात १४ टक्क्यांची वाढ असली तरी एकूण अन्नधान्यात सरासरी ९ टक्के घट अटळ आहे.

तेलबियांची स्थिती वाईट : तेलबियांचे पेरणी क्षेत्र ६ टक्क्यांनी वाढले तर उत्पादनात १३ टक्क्यांची घट आहे. तिळाचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक ६१ टक्के घटले, तर उत्पादनही ६८ टक्क्यांनी कमी झाले. साेयाबीन १३ टक्के, भुईमूग ११ टक्के, तीळ ६८ टक्के, सूर्यफूल ३१ टक्के, इतर तेलबियांचे उत्पादन ७९ टक्क्यांनी घटले आहे.

बातम्या आणखी आहेत...