आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेंडी सुटेना:हंगामाच्या पहिल्या टप्प्यात जिनिंग उद्याेगापुढे कापूसटंचाईचे संकट

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्याभरात कापसाच्या दरात माेठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहे. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता यंदाही कापसाला दहा हजारी भाव मिळण्याची प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यांनी बाजारात कापसाची आवक राेखली आहे. त्यामुळे यंदा कापूस हंगामाच्या सुरुवातीला जिनिंग उद्याेगात माेठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. संक्रांतीनंतर बाजारात कापसाची आवक वाढण्याचा अंदाज आहे. जगभरात कापसाचे उत्पादन घटले आहे. देशातही परतीच्या पावसाने नुकसान केल्याने यंदा कापसाची मागणी वाढली आहे.

दुसरीकडे दिवाळीपूर्वीच जिनिंग हंगाम सुरू हाेऊनही बाजारात अपेक्षित कापसाची आवक झालेली नाही. कापसाला सध्या प्रतिक्विंटल आठ ते साडेआठ हजार रुपयांपर्यंत भाव मिळताे आहे. गेल्या पंधरवड्यात हे दर नऊ हजारांवर गेेले हाेते. गेल्या वर्षीप्रमाणे कापसाला १० हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. भाववाढीच्या प्रतीक्षेत ९० % शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. अपेक्षित दर बाजारात नसल्याने शेतकरी कापूस विक्री करण्यास तयार नाही. त्याचा परिणाम जिनिंग उद्याेगावर झालेला आहे. डिसेंबरमध्ये तीन शिफ्टमध्ये चालणारे जिनिंग एका शिफ्टमध्येही पूर्णवेळ चालू शकत नाहीत.

उद्याेजकांचा खेडा खरेदीवर अधिक भर जिनिंग कारखान्यांत कापसाची आवक नसल्याने व्यापारी कापसाच्या शाेधात गावाेगावी फिरत आहेत. त्यांच्या साेबतीला जिनिंग उद्याेजकांनी स्वत:ची वाहनेदेखील दिली आहेत. काही जिनिंग उद्याेजक स्वत:च जास्तीचा दर देऊन कापूस खरेदी करीत असल्याची स्थिती आहे.

यंदा निर्यातीलाही फार प्रतिसाद नाही डिसेंबर अखेरपर्यंत देशात कापूस गाठी निर्यातीचे साैदे हाेतात. निर्यातदार जिनिंग कारखानदारांकडे येऊन हे साैदे करीत असतात; परंतु यंदा साैदे पूर्ण करण्यासाठीही कापूस नाही. शेतकऱ्यांनी प्रथमच ही कापूस काेंडी केल्याने त्याचा परिणाम निर्यातीवरदेखील हाेण्याची शक्यता आहे.

जानेवारीत बदल हाेणार सध्या बाजारात कापसाची आवक खूपच कमी आहे. शेतकरी भावाच्या प्रतीक्षेत कापूस विक्री करीत नाहीत. जानेवारीत संक्रांतीनंतर कापसाची आवक वाढेल असा अंदाज आहे. - नरेंद्र पाटील, जिनिंग उद्याेजक

बातम्या आणखी आहेत...