आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पेट्रोल-डिझेलची दैनंदिन विक्री प्रत्येकी 18 हजार लि. ने घटली, दरवाढीमुळे जळगावकरांनी केला पेट्रोलचा वापर 11 टक्क्यांनी कमी

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याचा परिणाम त्याच्या विक्रीवर झालेला आहे. जळगाव शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यांचा वापर तब्बल ११ आणि १८ टक्क्यांनी घटला असल्याचे समोर आले आहे. नैसर्गिक वाढीचा विचार केला तर ही घट त्यापेक्षाही जास्त असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

गेल्या जानेवारी २०२० ते जानेवारी २०२२ या दोन वर्षात पेट्रोलच्या किमतीत ३६.५६ टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे. जानेवारी २०२० मध्ये पेट्रोलचे सरासरी दर ८१.५० रुपये लीटर होते. जानेवारी २०२२ मध्ये तेच दर सरासरी १११ रुपये ३० पैशापर्यंत पोहोचले. ही दरवाढ मोठी असल्यामुळे पेट्रोलच्या वापरावर जळगावकरांनी मर्यादा आणल्या असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर आले आहे. जानेवारी २०२० या महिन्यात दररोज सरासरी १.६८ लाख लीटर पेट्रोल शहरात विकले गेले. जानेवारी २०२२ मध्ये मात्र रोज सरासरी १.५० लाख लीटर पेट्रोल विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

विक्रीतील आकडे घटतेच : जाने.२०२१ मध्ये पेट्रोलचे दर २०२० च्या तुलनेत ८१.५० रुपयांवरून वाढून ९३ रुपये झाले होते. दैनंदिन विक्री १.६८ लाख लि. वरून १.६५ लाख लि. वर आली होती. डिझेलचे दरही २०२१ मध्ये २०२० च्या तुलनेत ७० र.वरून ८२ रुपयांवर गेले.

डिझेल विक्रीत मोठी घट
गेल्या दोन वर्षात पेट्रोलच्या तुलनेत डिझेलचे दर कमी म्हणजे ३४.३२% वाढले. जानेवारी २०२० मध्ये सरासरी ७० रु. दराने विकले गेले. जानेवारी २०२२ मध्ये हा दर ९४ .३ रु. झाला. त्यामुळे डिझेलच्या दैनंदिन वापरातही मोठी घट नोंदवली गेली आहे. जानेवारी २०२० मध्ये शहरात रोज सरासरी ९६ हजार लीटर डिझेल विकले गेले. तेच जानेवारी २०२२ मध्ये मात्र ७८ हजार लि. वर आले आहे. ही घट तब्बल १८.७५% आहे. नैसर्गिक वाढीऐवजी ही घट लक्षात घेतली तर डिझेल वापरणाऱ्यांनी ते वापरण्यावर मोठेच नियंत्रण आणल्याचे चित्र आहे.

कंपन्यांनी दिलेले उद्दिष्ट राहिले अपूर्ण
पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी २०२० ते जानेवारी २०२२ या दोन वर्षांच्या कालावधीत पेट्रोल, डिझेलच्या विक्रीमध्ये घट झालेली आहे. इंधन कंपन्यांकडून पेट्रोलपंप चालकांना इंधन विक्रीचे उद्दिष्ट देण्यात येते. त्यामुळे शहरातील विक्रेत्यांकडून हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही.
- प्रकाश चौबे,अध्यक्ष, जळगाव पेट्रोल पंपमालक संघटना

बातम्या आणखी आहेत...