आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील अनेक भागात पथदिवे नसल्याने चाेरटे अंधाराचा गैरफायदा घेत आहेत. १० मार्च रोजी रात्री ९.१५ वाजता शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची तीन तोळे वजन असलेली सोनसाखळी ओढून दोन चोरटे पसार झाले. जिल्हा उद्योग केंद्राच्या मागे असलेल्या गल्लीत ही घटना घडली. वंदना सुभाष पवार (वय ५६, रा. प्रोफेसर कॉलनी, जळगाव) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्या मुलगा आर्यन (वय १७) याच्या सोबत रात्री शतपावली करीत होत्या. या वेळी दुचाकीने आलेल्या दोन भामट्यांनी अंधाराचा गैरफायदा घेत सुरुवातीला या दोन्ही मायलेकांच्या मधून दुचाकी नेली. यामुळे दोघांना घाम फुटला. तर काही सेकंदात रेकी केल्यानंतर भामटे यू-टर्न घेऊन पुन्हा आले.
यानंतर मागे बसलेल्या भामट्याने वंदना यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढली. आर्यनने आरडाओरड करून चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. एक अनोळखी तरुण देखील आर्यनच्या मदतीला आला होता; परंतु चोरटे भरधाव दुचाकीने महामार्गाच्या दिशने निघून गेले. या भागात काही ठिकाणी पथदिवे नसल्याने रात्री अंधार असतो. पवार मायलेकही काही मिनिटांसाठी अंधार असलेल्या गल्लीतून जात असतानाच रेकी केलेल्या चोरट्यांनी हातसफाई केली. वंदना पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख या घटनेचा तपास करीत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज घेतले
घटनेनंतर पवार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी या परिसरातील एका घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून चाेरट्यांचे फुटेज मिळवले आहे. त्यावरून तपास सुरू केला आहे. दोन्ही चोरट्यांनी तोंडाला काळे मास्क व डोक्यावर टोपी घातल्या होत्या. त्यांचे वर्णन पवार यांनी दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.