आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाळधी गावात महामार्गालगत मणियार इस्टेटमध्ये काळ्या पाषाणातील 36 फूट अखंड गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. या मर्ती प्रतिष्ठेच्या कामाला वेग आला असून, या कार्यक्रमाला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे.
कार्यक्रमाची तयारी जोरात
उद्योजक श्रीकांत मणियार यांच्या परिवारातर्फे पाळधी येथील त्यांच्या मालकीच्या परिसरात या भव्य मूर्तीचे मंदिर उभारण्यात येत आहे. अखंड पाषाणात कोरलेल्या या मूर्तीचे महिन्याभरापूर्वीच जळगावात आगमन झाले. त्यापूर्वी मूर्तीची स्थापना करण्यात येणाऱ्या ठिकाणी 21 करोड गणेश मंत्रांच्या वह्या पायात विधीपूर्वक ठेवण्यात आल्या आहेत. मूर्ती महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्यांनाही सहज दिसावी या दृष्टीने मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा करण्याच्या विधीला वेग आला आहे. मूर्ती ज्या ठिकाणी स्थापित होणार आहे, त्याच्या आजुबाजूला लोखंडी स्टक्चर उभारण्यात येत आहे.
सप्तधान्याचा समावेश
बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी धान्यादिवास विधी होणार आहे. त्यात मूर्तीच्या आजुबाजूला धान्याच्या राशी राहतील. पहिल्या टप्प्यात तब्बल 1 हजार किलो गव्हाची राशी असणार आहे. त्यानंतर तांदूळ, डाळी आदी सप्तधान्याचा यात समावेश असणार आहे. धान्यादिवास विधीत ज्या इष्टदेवतेची स्थापना करावयाची असते, ती मूर्ती ठेवली जाते. या धान्यराशी महिनाभर मूर्तीजवळ असतील. त्यानंतर तांदूळाच्या राशी ठेवल्या जातील. मग डाळींसह इतर धान्याचा समावेश असेल.
भाविकांकडूनही घेणार धान्य
धान्यादिवास या विधीसाठी गणेशभक्तांकडूनही धान्याचा स्वीकार केला जाणार आहे. यात अगदी 1 किलाे गव्हापासून आपापल्या इच्छेनुसार धान्य देवस्थानाला देता येणार आहे. धान्यादिवास विधीसाठी वापरल्या जाणाऱ्या गहू, तांदूळ व इतर धान्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर होणाऱ्या महाप्रसाद कार्यक्रमासाठी वापरले जाणार आहे.
डिसेंबरमध्ये प्राणप्रतिष्ठा
मंदिराचे विश्वस्त श्रीकांत मणियार म्हणाले की, एक महिना गहू, दुसरा महिना तांदूळ व नंतर सप्तधान्यादीवास या सोबत मंदिराचे राहिलेले बांधकाम आदी काम पूर्ण करून येत्या डिसेंबर महिन्यात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे नियोजन आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.