आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तांतराचे कर्जबेजारी!:युतीच्या काळात दीड लाखाच्या कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या 6 लाख शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा

जळगाव | प्रदीप राजपूत16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप-शिवसेना युती शासनाने २०१६ मध्ये शेतकऱ्यांसाठी १.५० लाख रुपयांपर्यंतच्या संपूर्ण कर्जमाफीची घाेषणा केली. ३० जून २०१६ पर्यंतचे ७५ लाख १८ हजार थकबाकीदार शेतकरी या ३४ हजार काेटींच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले. त्यापेक्षा जास्त कर्ज असलेल्या (मुद्दल+व्याज) शेतकऱ्यांना १.५० लाखावरील कर्ज फेडल्यास ओटीएस (वन टाइम सेटलमेंट) अंतर्गत लाभ मिळणार होता. मात्र, अशा एकूण ६ लाख शेतकऱ्यांना ओटीएससाठी वाढीव मुदत मिळण्यापूर्वीच राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाले. महाविकास आघाडीने २ लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफीची नवीन योजना आणली. मात्र, त्यात या ६ लाख शेतकऱ्यांचा समावेश केला नाही.

गेल्या ६ वर्षांत अशा वंचित शेतकऱ्यांवर प्रत्येकी १.८ लाख रुपयांच्या व्याजाचा बोजा वाढला आहे. २०१६ मध्ये ज्या शेतकऱ्यांवर २ लाखांचे कर्ज होते, त्यावरील व्याज १.४४ लाख रुपयांनी वाढले असून कर्जाचा डाेंगर ३.४४ लाख रुपयांवर गेला आहे. नुसता दंड आणि व्याजाचा आकडा ७ हजार काेटी रुपयांवर गेला आहे. एकूण थकबाकीची रक्कम तब्बल १६ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी युतीच्या काळातील ९ हजार कोटी रुपये होती. कर्जवसुली होत नसल्याने बँकांना १६ हजार काेटींची रक्कम एनपीएत टाकावी लागत आहे.

शेतकऱ्यांवर व्याजाचा डोंगर
महाविकास आघाडी शासनाने महात्मा जोतिराव फुले योजनेंतर्गत २०१५ ते २०१९ या काळातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दाेन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घाेषणा केली. मात्र त्यात युती सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा समावेश केलेला नाही. हे शेतकरी कर्जमाफी मिळेल या अपेक्षेत थांबले आहेत. त्यामुळे गेल्या ६ वर्षांत व्याजाची रक्कम प्रत्येकी १ लाखाने वाढली आहे.

६ वर्षांत १.८ लाखाने व्याज वाढले
कर्जमाफीच्या १.५० लाख रुपयांच्या रकमेवर २०१७ पासून प्रतिवर्ष १२% दराने ६ वर्षांत १.८ लाख रुपये व्याज वाढले आहे. ही रक्कम आता २.५८ लाख रुपयांवर गेली आहे. त्यावर २ टक्के दंडव्याज, ३ टक्के सरचार्ज (वसुली खर्च) वाढला आहे. एनपीए झालेले कर्ज वसूल करण्यासाठी बँकेकडून मालमत्ता जप्ती, लिलाव करण्यासाठी ६ टक्के दराने आकारणी केली जाते. हा खर्च पाहता शेतकऱ्यांवरील व्याजाचा डाेंगर वाढला आहे.

जळगाव जिल्ह्यातच ३०० काेटी थकले
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असलेल्या १.५० लाखपर्यंतचे कर्ज असलेल्या १६,२५१ शेतकऱ्यांकडे ८१ काेटी रुपये, तर १.५० लाखावरील १४,५१२ शेतकऱ्यांकडे २१७ काेटी रुपयांचे कर्ज थकले आहे.

आधीच्या सरकारची योजना बंदच केली
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची सर्वात माेठी कर्जमाफी दिली आहे. यापूर्वीच्या शासनाची कर्जमाफीची योजना बंद करण्यात आलेली आहे.
- बाळासाहेब पाटील, सहकारमंत्री, महाराष्ट्र सरकार

कर्ज भरून नव्याने बिनव्याजी कर्ज घ्यावे
व्याज वाढलेल्या शेतकऱ्यांची संख्या माेठी आहे. त्यांनी सवलतीच्या योजनेत आधीचे कर्ज फेडून नव्याने बिनव्याजी कर्ज घ्यावे. अनुदानासाठी नियमित परतफेड करणाऱ्यांची यादी शासनाने मागवली आहे.
- गुलाबराव देवकर, अध्यक्ष, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक.

बातम्या आणखी आहेत...