आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम चार वर्षे झाले तरी पूर्ण होऊ शकलेले नाही. मक्तेदाराकडून कोणी कमिशन घेतले आणि कोणाला लाच दिली याचा उलगडा व्हावा. मक्तेदारावर काय कारवाई करणार याचा लेखी खुलासा प्रशासनाने करावा या मागणीसाठी नाराज नगरसेवकांसह रहिवाशांनी सोमवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल, महावीर जिनिंगजवळ, कानळदा रिक्षा स्टॉप परिसरात धरणे आंदोलन केले.
आंदोलनात सकाळी सुमारे १५० नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थिती दिली तर दिवसभरात शेकडो नागरिकांनी पाठिंबा दर्शवला. नगरसेवक अॅड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, प्रिया जोहरे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करून त्याचा खुलासा करण्याचीदेखील मागणी आंदोलकांनी केली. या वेळी विजय राठोड, पृथ्वीराज मोरे, नीलेश इंगळे, योगेश चौधरी, नवल सपकाळे, उमाकांत वाणी, भगवान धनगर, अशोक सोनवणे, रत्नाकर चौधरी उपस्थित होते. आंदोलनासमोरून महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी गेले; परंतु त्यांनी विचारणाही केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याने आंदोलकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटताना दिसला.
ठेकेदारांनी करावा खुलासा
आंदोलनात अॅड. पोकळे व नगरसेवकांनी उड्डाणपुलाचे काम किती दिवसात पूर्ण होईल, जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता व मनपा आयुक्त व ठेकेदार यांच्यापैकी कोणाला पुलाचे काम होऊ नये असे वाटते, सरकारी अधिकाऱ्यांनी पैसे कमवायचे आणि शिव्या व बदनामी लोकप्रतिनिधींना हा कुठला न्याय आहे? असा सवाल केला. ठेकेदारांनी खुलासा करून कोणत्या लोकप्रतिनिधीला किती कमिशन दिले व अधिकाऱ्यांला किती लाच दिली याचा खुलासा करावा अशी मागणी या धरणे आंदोलन प्रसंगी करण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.