आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांच्या खंडानंतर राज्यातील प्रसिद्ध अशा आदिशक्ती मुक्ताई पालखीचे आषाढी वारीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरुवात जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी येथे पहाटे काकडा आरतीने झाली. संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. गजानन महाराज मंदिरावरून परिवर्तन चौक, बसस्थानकाकडून पालखी नीळकंठ महाजन यांच्या घरी पोहोचली. तिथेच दुपारचे भोजन झाले. त्यानंतर सातवड या गावी पालखीचा पहिला मुक्काम झाला. कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पालखी रवाना झाल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह जाणवला. राज्यभरातील विविध भागांमधील वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्यात मध्य प्रदेशातील वारकऱ्यांचाही समावेश आहे. पालखी सोहळ्यात टाळकरी फडावरील कीर्तनकार व वारकरी हजारोच्या संख्येने सहभागी झालेले आहेत. या वेळी खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकुटुंब पालखीचे दर्शन घेतले.
३४ दिवसांचा प्रवास
आदिशक्ती मुक्ताई पालखीचे यंदा ३१३ वे वर्ष असून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पालखीचा मान मुक्ताई पालखीला मिळतो. पालखीचा पायी प्रवास ७०० किमीचा व ३४ दिवसांचा आहे. पंढरपूरला सर्वप्रथम अगोदर पोहोचणारी मुक्ताईची पालखी आहे. पालखीच्या वाटेत ठिकठिकाणी भाविकांनी वारकऱ्यांसाठी भोजन व फराळाची व्यवस्था केली आहे.
टाळ, मृदंगाच्या गजरात वातावरण झाले भक्तिमय पालखी सोहळ्याची सुरुवात जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी येथून मूळ स्थानावरून शिस्तबद्ध पद्धतीने झाली. यात टाळकरी, मृदंगवादक, कीर्तनकार आणि वारकऱ्यांच्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले होते. मुक्ताईनगर शहरातून निघालेला पालखी सोहळा पाहण्यासाठी शहरातील भाविकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.
पालखीसोबत डॉक्टरांचे आरोग्य पथक, पाण्याची सोय
सोहळ्यात हजारो भाविकांचा समावेश असल्याने पिण्याचे पाणी, आरोग्य पथक, डॉक्टर यांचाही समावेश आहे. मुक्ताई पालखीने शुक्रवारी सातोड या गावी मुक्काम केला. पुढे बुलडाणा, जालना, बीड या ठिकाणी मुक्ताईचे आजोळ असल्याने गोविंदपंतांच्या समाधिस्थळी दोन दिवसांचा मुक्काम असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.