आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी:आदिशक्ती मुक्ताई पालखीने पंढरपूरकडे केले प्रस्थान ; सोहळ्यातील टाळ-मृदंगाच्या गजराने दुमदुमली मुक्ताईनगरी

मुक्ताईनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आदिशक्ती मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरुवात पहाटे सहा वाजता काकडा आरतीने झाली. संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्याहस्ते अभिषेक करण्यात आला. सकाळी ११ वाजता मूळ स्थानावरून पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी पालखी सोहळ्यात खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकुटुंब दर्शन घेतले. गजानन महाराज मंदिरावरून परिवर्तन चौक, बस स्थानकाकडून पालखी नीळकंठ महाजन यांच्या घरी पोहोचली. तिथेच दुपारचे भोजन झाले. त्यानंतर सातवड या गावी पालखीचा पहिला मुक्काम झाला. कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा पालखी रवाना झाल्याने, वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह जाणवला. राज्यभरातील विविध भागांमधील वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्यात मध्य प्रदेशातील वारकऱ्यांचाही समावेश आहे. पालखी सोहळ्यात टाळकरी फडावरील कीर्तनकार व वारकरी हजारोच्या संख्येने सहभागी झालेले आहेत.

७०० किमीचा ३४ दिवसांचा प्रवास आदिशक्ती मुक्ताई पालखीचे यंदा ३१३वे वर्ष असून, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पालखीचा मान मुक्ताई पालखीला मिळतो. पालखीचा पायी प्रवास ७०० किमीचा व ३४ दिवसांचा आहे. पंढरपूरला सर्वप्रथम अगोदर पोहोचणारी मुक्ताईची पालखी आहे. पालखीच्या वाटेत ठिकठिकाणी भाविकांनी वारकऱ्यांसाठी भोजन व फराळाची व्यवस्था केली आहे. वातावरण झाले भक्तीमय पालखी सोहळ्याची सुरुवात जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी येथून मूळ स्थानावरून शिस्तबद्ध पद्धतीने झाली. यात टाळकरी, मृदुंग वादक, कीर्तनकार आणि वारकऱ्यांच्या भजनांनी वातावरण भक्तीमय झाले होते. शहरातून निघालेला पालखी सोहळा पाहण्यासाठी शहरातील भाविकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे यात्रेचे स्वरूप आले होते. आरोग्यासह विविध पथके सोबत सोहळ्यात हजारो भाविकांचा समावेश असल्याने पिण्याचे पाणी, आरोग्य पथक, डॉक्टर यांचाही समावेश आहे. मुक्ताई पालखीने शुक्रवारी सातोड या गावी मुक्काम केला. पुढे बुलडाणा, जालना, बीड या ठिकाणी मुक्ताईचे अजोळ असल्याने, गोविंद पंतांच्या समाधीस्थळी दोन दिवसांचा मुक्काम असेल.

बातम्या आणखी आहेत...