आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावत घाणीचे साम्राज्य:शहरातील रथचौक परिसरात साचते पावसाचे पाणी, तुंबलेल्या पाण्यामुळे रहदारीस अडचण

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहरातील प्रभाग 4 परिसर हा मुख्य बाजारालगत येत असल्याने हा परिसर दाटीवाटीने वसला आहे. या परिसरात रथचौक, गांधी मार्केट आदी मुख्य बाजाराचा भाग येत असल्याने रस्त्यांवर नेहमीच रहदारीची समस्या येते. त्यातच रथचौक हा खोलगट भागात वसलेला असल्याने या परिसरात पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात पाणी तुंबून रहदारीस अडथळा ठरते. ही दरवर्षीचीच समस्या असल्याने रस्त्यांसह गटारी तुंबणार नाहीत याची काळजी घेत. रस्त्यांवरील पाण्याचा लवकरात लवकर निचरा कसा होईल याच्या नियोजनसह परिसरातील गटारींवरील तुटलेले ढापे करण्याची गरज आहे.

दालफळ, रथ चौक, नानकनगर, ओक प्लॉट, चौगुलेमळासह अनेक पेठा या प्रभागात येतात. या परिसरातील अनेक भागांतील गटारींवरील ढाप्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. अनेकदा तुंबलेल्या गटारी, त्यावरील तुटलेले ढापे, गटारीचा निचरा न होता गाळ साचून राहणे, ठिकठिकाणी विखुरलेला कचरा, खड्डेयुक्त रस्ते व सार्वजनिक शौचालयाची झालेली दुरवस्था आदी बाबी या परिसरातील नागरिकांच्या नित्याच्या झाल्या आहे.

रथ चौकात कमरेएवढे पाणी

रथचौक परिसरातील किसन मेथे म्हणाले की, रथ चौक हा शहराचा मानबिंदू आहे. या परिसरात अनेक सुवर्णपेढ्या असल्याने शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचा या परिसरात राबता असतो. मात्र, पावसाळ्यात पाण्याचा निचऱ्याअभावी या परिसरात दीड फूट ते कमरेएवढे पाणी साचते. त्यातच या परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरासह या परिसरातील अनेक दुकाने व घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे या परिसरात पाणी थांबणार नाही या उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे.

गटारीच्या घाणीतच नळ

गांधी मार्केटमधील व्यावसायिक मुकेश कासार म्हणाले की, गांधी मार्केटलगत पाण्याचा नळ आहे. हा नळ गटारीतच असल्याने अनेकांना या गटारीतच पाय ठेवून पाणी भरावे लागते. या नळालगत मोठ्याप्रमाणात पाणी साचते. या साचलेल्या पाण्याभोवती आजूबाजूचा कचरा, घाण उडून येथेच साचते त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांना नळापर्यंत जाण्यास अडथळा येतो. त्यामुळे येथे पाणी न साचता त्या पाण्याचा निचरा होण्याची गरज आहे. तसेच या गटारीची नियमित साफसफाई होण्याची गरज आहे.

अनेक भागातील ढापे तुटलेले

बालाजीपेठमधील रहिवासी महिला मीना कदम म्हणाल्या की, रस्ता ओलांडताना गटारींचा अडथळा ठरतो. त्यामुळे दोन रस्ते जोडण्यासाठी ढापे तयार केले आहे. मात्र, गटारींप्रमाणेच गटारींवरील ढापेही नवीन करण्याची गरज आहे. रस्ता ओलांडण्यासाठी जरी हे ढापे तयार केले असले तरी या तुटक्या ढाप्यांमुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे. अनेक भागातील ढापे हे तुटलेले असल्याने यातून आसाऱ्या बाहेर दिसून येतात. त्यामुळे त्या अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. असे तुटलेले ढापे शनिपेठ, बालाजीपेठ, बळीरामपेठ आदी परिसरात आढळून येतात.

बातम्या आणखी आहेत...