आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात असलेल्या शेतकऱ्याला शेती उपयोगी साहित्याचे वाटप

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात असलेल्या यावल तालुक्यातील दहिगाव येथील शेतकऱ्याला स्पार्क इरिगेशनतर्फे 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचे ठिबक सिंचन व शेती उपयोगी साहित्याची मदत करण्यात आली. गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या मदतीचे शेतकऱ्याला वितरण करण्यात आले.

संवेदना हेल्पलाइन सुरू

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, स्पार्क इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र लढ्ढा, दीपक परदेशी, मोहित पाटील उपस्थित होते. भरारी फाऊंडेशन राबवित असलेल्या शेतकरी संवेदना अभियानांतर्गत हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. याद्वारे शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या जातात. त्यावर उपाय योजना करण्यात येतात.

सात वर्षांपासून काम

यावल तालुक्यातील दहिगाव येथील शेतकरी अनिल पाटील यांनी संपर्क केला. ते अल्पभूधारक शेतकरी असून कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात असल्याचे फाऊंडेशनला कळाले. तसेच सिंचनाच्या साहित्याची त्यांनी मागणी केली. त्याची दखल घेत स्पार्क इरिगेशनचे रवींद्र लढ्ढा,रुपम लढ्ढा यांनी शेतकऱ्याला मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते शेतकरी पाटील यांना ठिबक व पाइप संचाचे शेती उपयोगी साहित्य मदत म्हणून देण्यात आले. कृषी विभागातर्फे शेतकऱ्याला सोयाबीन व तुरीचे बियाणे देण्यात आले. भरारी फाउंडेशन गेल्या 7 वर्षांपासून शेतकरी संवेदना अभियान राबवित असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना तसेच आत्महत्या केल्या.

आत्महत्या करू नये

शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मदतीचा हात देऊन प्रयत्नशील आहे. गेल्या 8 वर्षांपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची जबाबदारी घेऊन विधवा महिलांना रोजगार देणे व त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक जबाबदारी घेऊन त्यांचे भविष्य उज्वल करण्याची मोहिम फाऊंडेशनतर्फे राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, यासाठी देखील भरारीने ठोस पाऊल उचलले असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...