आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोमिलन:जिल्हा मनियार बिरादरी समितीने तीन संसारांची विस्कटलेली घडी बसवली; तलाक देऊन कायमचे संबंध मोडणाऱ्या जोडप्याचे केले मनोमिलन

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौटुंबिक कारणातून झालेल्या वादातून ‘तलाक’ देऊन संबंध मोडलेल्या दोन जोडप्यांचे मनोमिलन अाणि घटस्फोट घेतलेल्या एका जोडप्याचा विवाह अशा तीन जोडप्यांची संसाराची घडी पुन्हा बसवली. जिल्हा मनियार बिरादरी समितीने आठवड्याभरात ही दखलपात्र कामगिरी केली आहे. बऱ्हाणपूर, रावेर व बोदवड तालुक्यातील हे जोडपे आहेत.

बऱ्हाणपूर येथील पती व रावेर तालुक्यातील पत्नीने सोबत १३ वर्षे संसार केला. मात्र केवळ किरकोळ वैवाहिक वादातून पत्नीला तलाक देण्याचा प्रयत्न पतीने केला; परंतु या जोडप्याच्या बारावर्षीय मुलगी, एकवर्षीय बहीण व दहावर्षीय भावाने नातलगांच्या मदतीने जिल्हा मनियार बिरादरीकडे ही व्यथा मांडली. त्यात बिरादरीने पुढाकार घेऊन तिसऱ्या ‘तलाक’ला ब्रेक दिला. त्यांचा ‘निकाए ए साहनी’ करून त्यांना शेवटची संधी देत दोघांत मनोमिलन घडवून आणले.

तसेच रावेर तालुक्यातील एका दांपत्याला लग्नाला सात वर्षे होऊन दोन मुले झाली होती. मात्र, असे असतानाही पतीने वैवाहिक वादातून पत्नीला तलाक दिला. याप्रकरणी अकोला येथील धार्मिक न्यायनिवाडा केंद्र व जळगाव बिरादरी येथून मार्गदर्शन घेऊन तलाकला ब्रेक देण्यात आला. दोघांमध्ये समझोता घडवून वैवाहिक जीवनाची संधी बिरादरीने उपलब्ध करून दिल्याची माहिती बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी दिली. तिन्ही प्रकरणात अकोला येथील धार्मिक न्यायनिवाडा केंद्राचे प्रमुख मुफ्ती अशफाक यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. दारुल कजाचे मुफ्ती अतिकूर रहेमान, बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, तडजोड समिती अध्यक्ष सय्यद चाँद, सदस्य हारून शेख, सलीम मोहंमद, सादिक मुसा, अल्ताफ शेख, अख्तर शेख, रउफ रहिम, ताहेर शेख व समाज बांधव आदींचे विशेष सहकार्य लाभले.

चर्चा आणि समन्वयातून जुळली दुभंगलेली मने
बोदवड तालुक्यातील विवाहितेला इच्छापुरातील पतीने तलाक दिला. या घटस्फोटित महिलेस एका तरुणाने आमिष दाखवून घटस्फोटित महिलेशी विवाहबाह्य संबंध ठेवले. ही बाब निदर्शनास येताच, मनियार बिरादरीने त्या तरुण व घटस्फोटित महिलेशी चर्चा घडवून आणली. दोघांचा विवाह ठरवून त्यांच्या पालकांशी बोलून त्यांचा विवाह लावून दिल्याने घटस्फोटित महिलेस न्याय मिळवून दिला.

बातम्या आणखी आहेत...