आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाचीच शाळा:राज्यमंत्री सत्तारांच्या अखत्यारीतील शिक्षण संस्थेमध्ये खुलेआम काॅप्या, दिव्य मराठीने उघडकीस आणला फर्दापूरच्या संस्थेतील गैरप्रकार

जळगाव\ धनश्री बागूल, गणेश सुरसे |4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या मंत्रिमंडळात ‘विशेष साहाय्य’ खात्याचे राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्या अखत्यारीतील फर्दापूरचे महाविद्यालय परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ‘विशेष साहाय्य’ करणारे महाविद्यालय म्हणून कुप्रसिद्ध आहे. या महाविद्यालयात मंगळवारी १२ वीच्या हिंदी विषयाच्या परीक्षेच्या वेळी परीक्षार्थी बेंचवर थेट पुस्तकाची पाने ठेवूनच उत्तरे लिहित असताना ‘दिव्य मराठी’च्या कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. ‘मागच्या वेळी जिथे बसला होतात तिथे बसा’ ही तिथली बैठक व्यवस्था होती तर ‘काॅपी करण्यासाठी पुस्तक आणले नाही, मग इथे काय जेवायला आला का?’ हा तिथल्या शिक्षक वजा पर्यवेक्षकांचा परीक्षार्थींना प्रश्न होता.

जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर फर्दापूर हे गाव आहे. विधानसभेच्या सिल्लोड मतदारसंघात ते येते. नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड संचलित, नॅशनल कला व विज्ञान महाविद्यालय या नावाचे महाविद्यालय तिथे आहे. या शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद सध्या सिल्लोडचे शिवसेना आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाकडे आहे. त्याआधी तेच या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळत होते. कोणत्याही परीक्षेत विशेष साहाय्य करण्यासाठीच हे वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे जळगाव, औरंगाबादसह मुंबई आणि पुण्याचे विद्यार्थीही तिथे प्रवेश घेतात. मंगळवारी १२वीची हिंदी विषयाची परीक्षा होणार होती. इतक्या सोप्या विषयाच्या वेळी तिथे कसे वातावरण असते, हे टिपण्यासाठी ‘दिव्य मराठी’ची टीम तिथे गेली. त्यावेळी जे चित्र समोर आले ते धक्कादायक होते.

पर्यवेक्षक फक्त प्रश्न- उत्तरपत्रिका वाटायला

सकाळी साडेआठ वाजताच ‘दिव्य मराठी’ टीम तिथे पोहोचली तेव्हा महाविद्यालयात कोणीही नव्हते. वर्गखोल्यांच्या खिडक्या उघड्या होत्या. बेंचवर एमपीएससी परीक्षेसाठीचे क्रमांक चिटकवलेले होते. १२ वी परीक्षार्थींचे क्रमांक नव्हते. जेव्हा परीक्षेच्या काही वेळ आधी विद्यार्थी त्या खोल्यांमध्ये आले तेव्हा ‘मागच्या वेळी जिथे बसला होतात तिथे बसा’ असे निर्देश तिथे पर्यवेक्षकांनी दिले. (त्याचे ध्वनीमुद्रण आहे.) विद्यार्थ्यांनी जागा घेतल्यावर त्यांना उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या. त्या मिळताच विद्यार्थ्यांनी पुस्तके आणि काहींनी पुस्तकांतील उत्तरांच्या फोटो काॅपी बेंचवर ठेवून उत्तरे लिहिणे सुरू केले. पर्यवेक्षक उत्तरपत्रिकांवर स्वाक्षरी करून जे निघून गेले ते थेट पेपर घेण्यासाठीच आले. शिक्षक, कर्मचारीही काॅपी पुरवित होते. इमारतीच्या मागच्या बाजूला फिरणाऱ्या ‘दिव्य मराठी’ टीमला पालक समजून एका शिक्षकाने तर ‘सर्वकाही व्यवस्थित आहे’ असे सांगत दिलासाही दिला. परीक्षा केंद्राचे चित्रीकरण करताना कुणीही विचारलेही नाही.

विद्यार्थ्यांशी संवादातून असा झाला गाैप्यस्फाेट...
इथे मुंबई, पुण्याचेही मुले प्रवेश घेतात. काही वयस्क माणसेही परीक्षा द्यायला लांबून येतात. कारण इथे पास होण्याची हमी असते.
परीक्षेला येताना ‘गाइड’ सोबत आणावे लागते. ते आणले नाही तर ‘इथे काय जेवायला आला का?’ असे म्हणून शिक्षक रागवतात.
तुम्ही किती लिहू शकतात यावर गुण अवलंबून आहेत. शिक्षक मदत करतात, तरी काही मुलांना लिहिता येत नाही. त्यांना कमी गुण मिळतात.
मंत्र्यांचे काॅलेज आहे. इथे कोणी तपासत नाही. आले तरी कळते. रस्त्यावर माणसं लक्ष ठेवूनअसतात
बाहेरगावचे पोरं-पोरी तर प्रवेश घ्यायला आणि परीक्षा द्यायला असे दोनच वेळा काॅलेजात येतात. आम्हीही बाहेरगावचे आहोत. आम्हीही दोनच वेळा इथे येतो.
तुमच्या मुलाला पास करायचे असेल तर इथल्या शिक्षकांना भेटून घ्या. ते पास होण्याची हमी घेतात.

बातम्या आणखी आहेत...