आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो; मात्र बदलत्या काळानुसार होळीचा चेहराही बदलला आहे. एकेकाळी हा सण फुले आणि नैसर्गिक घरगुती रंगांनी खेळला जायचा, त्या जागी आता चकाकणारे रासायनिक रंग आले, पाण्याचे फुगे आणि पाण्याच्या फॅन्सी पिचकाऱ्या आल्या आहेत. हे घटक डोळ्यांसाठी इजा निर्माण करतात. दरवर्षी शहरात होळीला डोळ्यांना इजा होणारे शंभराहून जास्त रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात रेटिनाला धोका पोहाेचण्याचे प्रमाण अधिक आहे. धूलिवंदनाच्या आनंद लुटताना रंग खेळल्यानंतर रंग सहज निघावे यासाठी कोल्ड क्रिमचा जाड थर तुमच्या डोळ्यांभोवती लावा.
त्यामुळे डोळे जेव्हा धुता तेव्हा रंग सहज निघून जातो. पाण्याने रंग काढताना डोळे घट्ट झाकून ठेवा. कारने प्रवास करणार असाल तर खिडक्यांच्या काचा लावा. काही वेळा एखाद्या अनाहुताने मारलेला एखादा फुगा खिडकीतून येऊन डोळ्याला लागू शकतो. मुलांनाही नॉन-टॉक्सिक रंग वापरण्यास सांगा. तुमच्या डोळ्यांचा रंगीत पाण्यापासून बचाव करण्यासाठी गॉगल लावा. धूलिवंदननामुळे होणाऱ्या त्रासामुळे होणाऱ्या बऱ्याच इजा अशाप्रकारच्या आहेत.
रंगांमुळे हा त्रास हाेऊ शकताे
पारपटलावर ओरखडे निर्माण होणे, डोळ्यांमध्ये रसायनांमुळे जळजळ, ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस (डोळे येणे), डोळ्यावर फुगा फुटल्याने धक्का बसणे आणि डोळ्याच्या आतील बाजूस रक्तस्राव होणे, डोळ्याच्या भिंगाचे स्थान बदलणे, रेटिना निघणे, मॅक्युलर अडेमा ला सूज येणे या त्रासांचा सामना करावा लागू शकताे.
डाेळ्यांची काळजी घेण्याकडे लक्ष द्यावे
कॉन्टॅक्ट लेन्सेस होळीसाठी सुरक्षित पर्याय आहे असे अनेकांना वाटते; मात्र डोळ्यात जाणारा प्रत्येक रंग ते शोषून घेत असतात आणि तो एका ठिकाणी साकळतो. त्यामुळे काॅन्टॅक्ट लेन्स टाळावे. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायचेच असतील तर डिस्पोसेबल कॉन्टॅक्ट लेन्स वापरावे आणि धुळवड किंवा रंगपंचमी खेळून झाल्यावर ते टाकून द्यावे. - डॉ.धर्मेंद्र पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ, जळगाव
डोळ्यांना इजा झाल्यास हे करा उपाय
डोळ्यात रंग गेल्यास भरपूर पाण्याने डोळे धुवा. डोळे लालसर होणे, वेदना होणे, जळजळ होणे किंवा प्रकाशाकडे पाहण्यास त्रास होणे, अशी लक्षणे दिसत असतील तर नेत्रविकार तज्ज्ञांची भेट घ्या. डोळे चोळू किंवा डोळ्यांना दाब देऊन मसाज करणे टाळायला हवे. डोळ्याला पाण्याचा फुगा लागला तर स्वच्छ कापडाने डोळा झाका आणि तत्काळ नेत्ररोग तज्ज्ञांना दाखवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.