आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात पदस्थापना:जीएमसीत 24 तास डॉक्टर उपलब्ध; मोहाडीहून पाच डॉक्टर कार्यमुक्त हाेऊन पुन्हा जीएमसीत झाले रुजू

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या माहिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालय हे कोरोना रुग्णांसाठी अधिग्रहित करण्यात आले होते. यासाठी याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती देखील करण्यात आली होती; मात्र आता रुग्ण नसल्याने याठिकाणी पाठवण्यात आलेल्या पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, त्यांना पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पदस्थापना देण्यात आली आहे. यामुळे आता २४ तास डॉक्टर उपलब्ध राहणार आहे.

कोरोनात जिल्हा रुग्णालयाने त्याच्याकडील पाच डॉक्टर मोहाडी येथे उपचारासाठी पाठवले होते. हे डॉक्टर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत होते. दरम्यान, हे डॉक्टर कमी झाल्याने रुग्णालयावर ताण वाढला होता.

आता कोरोना बाधितांची संख्या आढळून येत नसल्याने मोहाडी येथील पाचही डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. यात डॉ. स्वप्निल कळसकर, डॉ. दीपक जाधव, डॉ. नितीन विसपुते, डॉ. शिल्पा राणे आणि डॉ. विजय कुरकुरे या पाच डॉक्टरांचा समावेश आहे. हे पाचही डॉक्टर आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुन्हा रुजू झाल्याने जीएमसीचा ताण कमी झाला आहे.

१६ वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही करण्यात आली नियुक्ती
जीएमसीत नुकत्याच १९ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यात १६ डॉक्टरांना नियुक्ती देण्यात आली असून, हे डॉक्टर ओपीडीसह वैद्यकीय अधीक्षक कार्यालय व शवविच्छेदन विभागात कार्यरत असणार आहे. यामुळे मनुष्यबळाचा मोठा प्रश्न दूर झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...