आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे यांना टोला:मला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणू नका; काहींना राग येईल- धनंजय मुंडे

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे घेऊन जावे अशी इच्छा मुंडे साहेबांचे मित्र एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. मी स्वर्गीय मुंडे साहेबांच्याच पावलांवर चालतोय, परंतु मला त्यांचे वारसदार असे म्हणू नका कारण त्यामुळे कोणाला राग येऊ शकतो, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या व बहीण पंकजा यांचे नाव न घेता लगावला. कालपर्यंत खलनायक वाटत असताना आज मला नायक म्हणून स्वीकारल्याचे मंत्री मुंडे या वेळी म्हणाले.

जळगाव शहरातील मेहरूण परिसरात लाडवंजारी समाजातर्फे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारले जात आहे. त्याच्या भूमिपूजनासाठी धनंजय मुंडे आले होते. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी मंत्री एकनाथ खडसे, महापौर जयश्री महाजन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, वंदना चौधरी, एजाज मलिक, नामदेव चौधरी, प्रशांत नाईक, चंद्रकांत लाडवंजारी, राजेंद्र घुगे उपस्थित होते.

या वेळी माजी मंत्री खडसेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत धनंजय मुंडेकडून त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यावर मंत्री मुंडे म्हणाले की, मी अडीच वर्षांपूर्वीदेखील जळगावात आलो होतो, परंतु मेहरूणमधील समाजबांधवांनी मला बाेलावले नव्हते. तेव्हा मी खलनायक वाटत असेन, परंतु आज नायक म्हणून स्वीकारल्याचे समाधान आहे. मुंडे साहेबांसारखाच मीदेखील संघर्ष आणि केवळ संघर्षातून पुढे आलो आहे. त्यांचा वारसदार म्हटले तर इतर काेणाला राग येऊ शकतो.

दहा वर्षांपूर्वी मला शिव्या देणारे आजही प्रियच
दहा वर्षांपूर्वी मला शिव्या देणारे लोकदेखील मला आजही प्रियच आहेत. भगवान गडावर दहा वर्षांपूर्वी मला दगड खावे लागले होते. आता त्याच गडाचा दगड होण्याचा मान मला मिळत असल्याच्या भावना मुंडे यांनी व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...