आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात साडेपाच वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ४० टक्के भागात अमृत अंतर्गत पाणीपुरवठा सुरू आहे. महिनाअखेर आणखी सहा जलकुंभ कार्यान्वित होतील. त्याचा फायदा पाणीपुरवठ्याचे नियोजनात होणार असून, कमी वेळेत उच्च दाबाने पुरवठा करता येणार आहे. याशिवाय वेळेत बचत होऊन अवेळी होणारा पुरवठा टाळता येईल. हे अनुभवण्यासाठी जळगावकरांना आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या एकेक जलकुंभातून पुरवठ्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. अमृत अभियानात शहरात २०१८पासून पाणीपुरवठा योजना राबवली जाते आहे. जून २०२३मध्ये या योजनेच्या कामाला साडेपाच वर्षे पूर्ण होतील. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी योजनेसाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनीला कार्यादेश दिले होते. २४ महिन्यांत अर्थात १६ नोव्हेंबर २०१९ रोजी काम पूर्णत्वासाठी मुदत दिली होती; परंतु वारंवार मुदत देऊन साडेतीन वर्षे लोटले गेले आहेत.
कवयित्री बहिणाबाई जलकुंभावरून शुक्रवारपासून पुरवठा
कवयित्री बहिणाबाई जलकुंभ झोन क्रमांक ११ अंतर्गत ५ मेपासून अमृत योजनेचा नवीन जलवाहिनीद्वारे नियमित पुरवठा सुरू होणार आहे. बजरंग कॉलनी, दशरथनगर, श्रीराम कॉलनी, काशिनाथनगर, सदाशिवनगर, द्वारकानगर, सदोबानगर, योगेश्वरनगर आदी ४५ कॉलन्यांत पुरवठा होईल. या भागातील जुन्या जलवाहिनीचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. तसेच या झोनमधील खेडीगाव व आजूबाजूच्या परिसरात १२ मे नंतर नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे, असे अभियंता संजय नेमाडे यांनी सांगितले.
नियोजन : नवीन जलकुंभांची स्थिती अशी
सुप्रीम कॉलनी : या जलकुंभावरील जलवाहिनी जोडणी पूर्ण झाली आहे. १५ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभातून सुप्रीम कॉलनीसह वाढीव भागात पुरवठा सुरू.
रामेश्वर कॉलनी : रेमंड जवळील जलकुंभाची जलवाहिनी जोडणी पूर्ण झाली. ३० लाख लिटर क्षमतेच्या या जलकुंभातून काही भागात पाणीपुरवठा होतो आहे.
नित्यानंद जलकुंभ : रायसोनी नगरातील जलकुंभाला जलवाहिनी जोडणी पूर्ण झाली आहे. १५ लाख लिटर क्षमतेचा आहे. साफसफाई व टेस्टिंग केली जाईल.
निमखेडी : भागासाठीच्या जलकुंभाला जलवाहिनी जोडणी झाली. १५ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ असून, पाणीपुरवठा सुरू आहे. पिंप्राळा येथे मुख्य जलवाहिनीची जोडणीचे काम सद्यस्थितीत सुरू आहे.
गेंदालाल मिल : शिवाजीनगर, गेंदालाल मिलसाठी आणखी एक जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. पिंप्राळा रेल्वेगेटजवळ क्रॉसिंगचे काम प्रलंबित आहे. १५ लाख लिटर क्षमतेचा हा जलकुंभ आहे. सध्या जुन्या जलवाहिनीला जोडणी केली आहे. अयोध्यानगर : या भागातील २५ लक्ष क्षमतेच्या जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु विद्युत रोहित्राची अडचण आहे. ते स्थलांतरित झाल्यावरच जलवाहिनी जोडणी होईल. त्यानंतर तेथून पाणीपुरवठा होणार.
४३०० नळ कनेक्शन वाढले
महापालिकेने अमृत योजनेंतर्गत ६८ हजार नळजोडणीची यादी दिली होती. जुन्या जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळकनेक्शन असल्याने प्रत्यक्षात आकडा मोठा होता; परंतु योजनेंतर्गत नोंदणी असलेल्या मिळकतींनाच जोडणी मिळत असल्याने दोन वर्षात ४३०० नळजोडणी वाढली आहे. यामुळे प्रत्येक जोडणीतून दरवर्षी दोन हजारप्रमाणे ८६ लाख रुपये पाणीपट्टी वाढली आहे. बोगस नळकनेक्शनलाही आळा बसल्याचा दावा केला जातो आहे हे विसरता येणार नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.