आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:थंडीमुळे आहारात बाजरीला लाभतेय पसंती; गेल्या वर्षापेक्षा यंदा दर 10 रुपयांनी वाढले

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात मिळणारे विविध पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक समजले जातात. बाजरी हा यातील महत्त्वाचा घटक आहे. बाजरीत उष्ण गुणधर्म असल्याने सध्या घराेघरी आहारात बाजरीचा अधिक उपयाेग केला जात आहे. तसेच महिलांमध्ये लोह, हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याने ते वाढवण्यासाठीही आहारात बाजरीचा समावेश करण्यात येत आहे. दरम्यान, यंदा अवकाळी पावसामुळे प्रतवारीवर परिणाम झाल्याने बाजरीचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बाजरीचे किलाेमागे १० ते १२ रुपयांनी दर वाढले आहे.

बाजरीचं पीठ ग्लुटेनमुक्त असते. त्यामुळे बाजरीची भाकरी हिवाळ्यात खाल्ल्यामुळे पोटाशी आणि पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. पोटाच्या विकारांपासून दूर राहण्यासाठी बाजरीची भाकरी उत्तम असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. प्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी अनेकजण आहारात बाजरीसह तृणधान्य पदार्थांचा समावेश करतात. आहारतज्ज्ञही हंगामी अन्न खाण्यावर भर देतात. तसेच हंगामी आणि स्थानिक पदार्थ ऋतुमानानुसार काम करण्यास मदत करतात. म्हणूनच थंडीत बाजरी खाण्यास पसंती दिली जाते.

जानेवारीत येणार नवा माल
गतवर्षी बाजरीचे दर प्रतिकिलो २२ रुपये होते; मात्र यंदा दरात आठ ते १० रुपयांची वाढ झाली असून, दर्जानुसार ३० ते ३२ रुपये आहेत. आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये नवीन माल येण्यास सुरुवात झाल्यानंतर दर कमी होतील, असेही व्यापारी शांताराम नावरकर म्हणाले.

पचनक्रियेचा त्रास कमी
बाजरीने पचनक्रियेचा त्रास कमी होतो. पोटाच्या विकारांपासून दूर राहण्यासाठी आहारात बाजरीची भाकरी हा उत्तम मार्ग आहे. बाजरीत कार्बोदके, फायबर, प्रथिने टक्के, लोह, मॅग्नेशियम, उष्मांकासह कॅलरीज, कॅल्शियम व विविध जीवनसत्त्व मिळतात.- डॉ. जयदीपसिंग छाबडा, आयुर्वेद तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...