आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोकला:धूळ आणि प्रदूषित हवेमुळे जळगावकरांचा खोकला इतका वाढला की सरकारी रुग्णालयाचे सिरप संपले

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धूळ आणि प्रदूषित हवा यांचा शहरवासीयांवर इतका विपरीत परिणाम होतो आहे की, कोरड्या खोकल्याचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा रुग्णालयातील खोकल्याचे पातळ औषध दोन दिवसांपूर्वीच संपले आहे. शहरातील औषधी दुकानांवरही खोकल्यावरील पातळ औषधींच्या (सिरप) मागणीत सुमारे ३५ टक्के वाढ झाली आहे.

जळगाव शहरात सुरू असलेले रस्त्याचे काम, रस्त्यांवरील खड्डे, त्यातून उडणारी धूळ आणि त्यातच थंडीमुळे तयार होणारे धुके यामुळे शहरावर प्रदूषित हवेचे पांघरूण पडले आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो आहे. खासगी दवाखाने आणि शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्णांमध्ये ६० टक्के खोकला आणि ताप अशी तक्रार करणारेच आहेत. नेहमी वापरल्या जाणाऱ्या औषधांनी (अॅण्टिबायोटिक) त्यावर इलाज होत नाही. त्यामुळे कोणते औषध द्यावे असा प्रश्न डाॅक्टरांना पडतो आहे, अशी भावना दोन दिवसांपूर्वीच डाॅ. कल्पेश गांधी यांनी म्हटले होते.

मागणी दुप्पट झाली: या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील औषधाची मागणी वाढली आहे. दरवर्षी थंडीच्या दिवसांत या पातळ औषधाच्या साधारण रोज दीडशे बाटल्या रुग्णांना दिल्या जातात. यंदा त्यात दुपटीपर्यंत वाढ झाली आहे. रोज सरासरी पावणे तीनशे बाटल्या रुग्णांना दिल्या जात आहेत. त्यामुळे हे औषधच संपले आहे. डाॅक्टर्स केवळ औषधाच्या गोळ्या देऊन उपचार करीत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या औषधाची मागणी नाेंदवली आहे; मात्र, अजून किमान आठवडाभर तरी हे औषध प्राप्त होण्याची शक्यता वाटत नाही, असे सांगण्यात आले. दरम्यान, खासगी औषधी दुकानांवर खोकल्या साठीचे पातळ औषध आणि गोळ्यांच्या मागणीतही साधारण ३५ टक्के वाढ झाली आहे, असे जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी सांगितले.

आहारात डिंकाचे लाडू, पाणी उकळून प्यावे आहारात डिंकाचे लाडू, तूप, बाजरी, मका, पालेभाज्या, मांसाहार तसेच पाणीही उकळून प्यावे. दिवसभर कोमट पाणी घ्यावे. थंड पदार्थांचे सेवन टाळावे. धूळ हे खोकल्याचे मुख्य कारण ठरत असल्याने मास्कचा वापर करा. ताप असल्यास तपासणी करणे आवश्यक आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...