आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरसोली गावाजवळ असलेले इंद्रा सीड्स कंपनीच्या गोदामातून 93 हजार 750 रुपये किमतीचे कापसाचे एचटीबीटी बियाणे पथकाने मंगळवारी जप्त केले. साठवणुकीस बंदी असतानाही संबंधित कंपनीने कायद्याचे उल्लंघन केल्याचाही गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.
अन् छापा मारला
कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रदीप शांताराम बैरागी (रा. पाचोरा) व कंपनीमालक इंद्रवदन संकाभाई पटेल (रा. अहमदाबाद) या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा गृह नियंत्रक निरीक्षक (रासायिनक खते, बियाणे व किटकनाशके) अरुण श्रीराम तायडे यांनी या बाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तायडे यांना पुण्याच्या कृषी आयुक्तालयातील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी व औरंगाबादच्या सह सह संचालक कार्यालयातून संदेश मिळाला. यात शिरसोली जवळील इंद्रा सीड्स कंपनीच्या गोदामात बोगस, विनापरवाना एचटीबीटी कापूस बियाण्यांची छुप्या पद्धतीने साठवणूक केली असल्याची माहिती होती. त्यानुसार तायडे यांनी जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासह तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, श्रीकांत झांबरे, कमलेश पवार, भारत पाटील, पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांच्यासह गोदामात छापा मारला.
सर्व पाकिटे जप्त
गोदाम मालकास बोलावून कुलूप उघडले असता या गोदामात एका कोपऱ्यात एचटीबीटी कापूस बियाण्याचे 75 पाकीटे सापडली. या पाकिटांवर ‘कॉटन हायब्रीड सीडस, राजीकोट व्हीप गोल्ड’ असा उल्लेख केला होता. मागील बाजुस ‘ट्रुथफूल लेबल’ असे लिहीलेले होते. या पाकीटांवर उत्पादक, वितरक कंपनीचे नाव, पत्ता नसल्याचे सदर बियाणे बोगस असल्याचा संशय आला. याच संशयावरुन पथकाने सर्व पाकिटे जप्त केले. त्यांची किंमत 93 हजार 750 रुपये इतकी आहे. यातील दोन पाकिटे तपासणीसाठी ताब्यात घेतली. तर उर्वरित सर्व पाकिटे एमआयडीसी पोलिस ठाण्याने जप्त केली आहेत. या प्रकरणी प्रदीप बैरागी व इंद्रवदन पटेल या दोघांच्या विरुद्ध बोगस बियाणे साठवणुकीच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.