आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:‘मी पुन्हा येणार’च्या जपामुळेच सरकार गेले का याचा शाेध घेईन, एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

मुक्ताईनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ...त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता आणि शिवसेनेबरोबर युती असतानाही 105 आमदार निवडून आले

विरोधी पक्षनेतेपदी असताना अन्य नेत्यांना सोबत घेऊन राज्यात सत्ताधाऱ्यांविरुद्ध मी रान उठवले होते. त्यामुळे केवळ भारतीय जनता पक्षाने एकट्याच्या बळावर १२३ आमदार निवडून आणले. आता मात्र ‘मी एकटा’ ही प्रवृत्ती पक्षात शिरली आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना आणि शिवसेनेबरोबर युती असतानाही १०५ आमदार निवडून आले आहेत, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘मी पुन्हा येणार, पुन्हा येणार’चा जप लोकांना आवडला नाही आणि म्हणून राज्यात पक्षाची दुरवस्था झाली आहे का याचा आपण शोध घेणार आहोत, असेही सूतोवाच त्यांनी केले. बुधवारी खडसे यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त शुभेच्छा द्यायला आलेल्या मोजक्या कार्यकर्त्यांशी आणि काही दृकश्राव्य माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. या क्षणापर्यंत आपण कधीही भारतीय जनता पक्षावर टीका केलेली नाही, असे नमूद करून खडसे म्हणाले की, ज्या काळात आम्ही कष्टाने आणि मेहनतीने एकट्याच्या बळावर राज्यात सरकार आणले त्या काळात जे लोक पक्षातही नव्हते ते अलीकडच्या १०-१२ वर्षांत पक्षात जन्माला आले आणि चमकायला लागले आणि आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत. या प्रवृत्तींना पक्षात आपले प्रतिस्पर्धी नको आहेत. त्यांच्या ‘मी एकटा’ या प्रवृत्तीमुळे राज्यातले भाजपचे सरकार घालवले. या प्रवृत्तीच्या विरोधात जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. त्याचे एकत्रीकरण होऊन स्फोट कधी होईल हे मला सांगता येत नाही, असेही खडसे म्हणाले. अर्थात, अनेक पक्षांकडून बोलावणे असले तरी कुठल्या पक्षात जावे असे निदान आजपर्यंत तरी वाटलेले नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

आता केवळ १०५ आमदार आले... याचे कारण काय?

आपण विरोधी पक्षनेता असताना गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर, गिरीश बापट अशा सर्वांनी सोबत राहून सरकारविरोधात वादळ निर्माण केले होते. म्हणून १२३ आमदार एकट्याच्या बळावर आले. आता सर्व अनुकूलता असताना केवळ १०५ आमदार आले. हे काय आहे? केवळ ‘मी येणार, मी पुन्हा येणार’ ही बाब जनतेला आवडली नाही का याचा आपण शोध घेणार आहोत.