आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या अफवा असून आपण भाजप सोडणार नाही, असा दावा आतापर्यंत करणाऱ्या एकनाथ खडसे यांनीच कार्यकर्त्याशी बोलताना महिनाभरात आपण ‘जाणार’ असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणते पद दिले जाते याची त्यांना प्रतीक्षा असल्याचेही त्यांच्या बोलण्यातून समोर आले आहे.
वरणगाव येथील एक तरुण समर्थक रोशन भंगाळे याच्याशी खडसे यांचा फोनवर झालेला संवाद ध्वनिमुद्रित करण्यात आला असून तो व्हायरल करण्यात आला आहे. फोनवरील संवाद रेकाॅर्ड होतो आहे, याची कल्पना खडसे यांना नसावी. त्यामुळे त्यांनी मोकळेपणे संवाद साधला आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांनाही स्थान मिळाले. पण खडसे यांना पुन्हा डावलण्यात आले. त्यामुळे इकडे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत, असे सांगत हा कार्यकर्ता खडसे यांना लवकर निर्णय घेण्याची विनंती या संवादात करतो. त्यावर खडसे यांनी ‘समजा आपण उद्याच तिकडे गेलो तर काय करणार आहे तिथे जाऊन? काही पद नाही, काही नाही आणि नुसतच जाऊन बसायचं का लाचारासारखं हादरणं (फरशी पुसण्याचे फडके) बनून?’ असा प्रश्न त्यांनी या कार्यकर्त्याला विचारला आहे. आपण जाणार आहोत महिनाभरात; पण त्याआधी काही पद वगैरे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या वृत्ताला त्यांच्याकडून दुजोरा मिळाला आहे.
माझ्या आवाजाची नक्कल
व्हायरल झालेल्या संभाषणात आपला आवाज नसल्याचा खुलासा खडसे यांनी केला आहे. माझ्या आवाजाची नक्कल करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.