आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंचे सीमोल्लंघन:पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला; शुक्रवारी खडसे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता, राज्याच्या मंत्रिमंडळातही होऊ शकतो फेरबदल

चरणसिंग पाटील | जळगाव2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रक्षा खडसे भाजपतच राहतील; रोहिणी यांचाही प्रवेश शक्य

राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सातत्याने नाकारत आले असले तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यासाठीचा मुहूर्त अखेर सापडला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी ते आणि त्यांच्या कन्या, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे कार्यकर्त्यांसह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाकडून गेल्या साडेचार वर्षांपासून डावलले जात असल्यामुळे एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विशेष राग आहे. पक्षातील केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांना भेटूनही उपयोग झाला नाही, याची त्यांना खंत आहे. विधानसभा, विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेतही डावलले गेल्याने त्यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेत्यांशी चर्चा केल्यामुळे या पक्षांतराच्या वृत्ताला पुष्टी मिळाली होती.

खडसेंसाठी मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याचीही वाढली शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर खडसे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असेही विश्वसनीय वृत्त आहे. त्यासाठी मुंबईस्थित एक तरुण मंत्री राजीनामा देतील आणि मुंबईतील पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारतील. शिवाय, पूर्वी प्रशासनात राहिलेले राष्ट्रवादीचेच एक ज्येष्ठ मंत्रीही प्रकृतीच्या कारणाने राजीनामा देण्याची शक्यता असून खडसेंना संधी मिळू शकते.

मुक्ताईनगरात खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले फलक.
मुक्ताईनगरात खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले फलक.

महाजनांनाही अडचण :

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे आमदार माजी मंत्री गिरीश महाजन यांचेदेखील खडसे यांच्याशी त्याच काळात बिनसले आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाऊन मंत्री झाले तर त्याचा त्रास गिरीश महाजन यांनाही होण्याची शक्यता आहे.

रक्षा खडसे भाजपतच राहतील; रोहिणी यांचाही प्रवेश शक्य

भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे मात्र भाजप सोडणार नाहीत. त्यांच्या मदतीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारीही पक्षातील राहातील, असे ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येते. लोकसभेची मुदत संपल्यानंतर त्यांचेही पक्षांतर हाेईल, असे सांगण्यात येते आहे.

देवेंद्र फडणवीस असू शकतील पुढचे लक्ष्य

ज्यांच्यामुळे एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला आणि नंतर आमदारकीही नाकारली गेली त्या देवेंद्र फडणवीस यांना पुढच्या काळात एकनाथ खडसे यांच्याकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. खडसे यांच्या फडणवीस यांच्या विरोधातील बोलण्याला वजन प्राप्त व्हावे यासाठीच त्यांना मंत्री केले जात असल्याचे वृत्त आहे.

जळगाव मनपात भूकंप : भाजपची सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेला खडसेंकडून प्रथम लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून ही मनपा काढून घ्यायची किंवा बरखास्त करायची, असे सूत्र असू शकते.

रोहिणी यांना उमेदवारी :

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते आहे.

बातम्या आणखी आहेत...