आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:आम्ही सत्तेत आल्यापासून लोक विस्कळीत आहेत अन् देव पण; गुलाबराव पाटलांचे खळबळजनक वक्तव्य

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हा अवेळी पडणारा पाऊस आहे. त्यामुळे सरकार आल्यापासून आम्ही पंचनाम्यांमध्येच गुंग आहोत. मागचे अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो. इकडे आल्यानंतर ब्रेक के बाद गारपीट सुरु आहे. लोकच काय देवही विस्कळीत असल्याची अस्वस्थता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

धरणगाव येथे चर्मकार समाजाच्या मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते. या मेळाव्याच्या प्रारंभी अवेळी पावसाने हजेरी लावली. अवेळी पावसाचा धागा पकडून त्यांनी मोजक्या शब्दात शिंदे-फडणवीस सरकारमधील स्थित्यंतरांवर भाष्य केले.

अवकाळी पावसावरुन त्यांनी विधान केले असले तरी त्या गर्भीत अर्थ दडलेला आहे. त्यावर समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री पाटील म्हणाले, नेत्यांना श्रीमंती कार्यकर्त्यांचीच असते. कार्यकर्त्यांची श्रीमंती असल्यास त्याची फलश्रूती आशिर्वादाने होत असते. संत रोहिदास महामंडळात आर्थिक तरतूद करावी. रोहिदास महाराज जयंतीच्या दिवशी शासकीय सुटी जाहीर करण्याची विधीमंडळात मागणी करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

राज्यात घडामोड झाल्यावर कळवतो...

उध्दव ठाकरे बारसूला जाणार असल्याने वातावरण तापले असल्याबाबत पत्रकारांनी मंत्री पाटील यांना प्रश्न विचारला. त्यावर वातावरण तापलेय की नाही हे माहित नाही. बारसू प्रकल्पासाठी पक्षीय अभिलेष न ठेवता पक्षीय हिताचा निर्णय घ्यावा. राष्ट्रवादीच्या बैठकीला अजीत पवार अनुपस्थित होते. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. शरद पवारांच्या राजीनाम्याच्या विषयावर त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. राज्यात सत्ताबदलाच्या घडामोडी सुरु आहेत. त्या दृष्टीने शरद पवार यांनी चाचपणी केल्याचे बोलले जात असल्याच्या प्रश्नावर घडामोड झाल्यावर तुम्हाला कळवेल,असे उत्तर मंत्री पाटील यांनी दिले.

शिंदे-ठाकरे गट एका व्यासपीठावर... चर्मकार समाजाच्या मेळाव्यात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ व्यासपीठावर एकत्र होते. शिवसेनेत फूट पडल्यापासून दोघेही सातत्याने एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसतात. त्यामुळे या दोघांना प्रथमच एकाच व्यासपीठावर बघून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.