आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळा सुरू होऊन महिना लोटला तरी सीबीएसईचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकाविना भविष्याचे पाढे गिरवत आहेत. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार देशभरातील सर्वच अभ्यासक्रमांमध्ये बदल होत असल्याने एनसीईआरटीने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या पुस्तकांचे प्रकाशन बंद केले आहे. त्यामुळे या पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर टंचाई भासू लागली आहे. याबाबत शासनस्तरावर हालचाली होत नसल्याने पालकांसह शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सद्य:स्थितीत बाजारात सीबीएसईची पहिली ते दहावीची ६० टक्के पुस्तके उपलब्ध नाही. त्यामुळे पुस्तके इंटरनेटवरून डाऊनलोड करण्याकडे कल वाढला आहे. परिणामी ४० रुपयांचे पुस्तक २ हजार रुपयांना पडत असल्याने पालकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. मुलांचे पुस्तकाविना शिक्षण चालू असल्याने पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केवळ एकाच इयत्तेची अथवा एखाद्या विषयाच्या पुस्तकाची कमतरता समजण्यासारखी होती; मात्र इथे इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विविध विषयांच्या पुस्तकांचा तुटवडा आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांना माेठ्या प्रमाणात अडचणी येत आहे.
पालकांचे ‘आर्थिक’ गणित बिघडले
इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विज्ञान आणि गणिताची पुस्तके कमी अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. सहावी गणित, विज्ञान तर आठवी ते दहावी इयत्तांमधील समाजशास्त्र, इतिहास आणि भूगोलाची पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेली नाही. हीच अवस्था पाचवीपासून आठवीपर्यंतच्या हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित तसेच संस्कृत या विषयांची आहे. पुस्तके कधी उपलब्ध होतील याची शाश्वती नसल्याने पालक ती इंटरनेटवरून डाऊनलोड करत आहेत. काही पालकांनी यासाठी प्रिंटर खरेदी केला आहे. त्यामुळे आर्थिक झळ पालकांना साेसावी लागत आहे.
मंत्रालयात पत्र पाठवून करणार मागणी
केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारकडून छपाई न झाल्याने ही स्थिती उद्भवल्याचे सीबीएसई पाठ्यपुस्तकांच्या विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दिल्ली कार्यालयाकडे याबाबतची विचारणा केल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगण्यात येते. पुस्तकांच्या तुटवड्यामुळे अनेक पालकांनी एनसीईआरटी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र पाठवून पुस्तके उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत अद्याप काेणीतही हालचाल झालेली नाही.
आठवड्याभरात पुस्तके येणार
सीबीएसईच्या पुस्तकांची छपाई न झाल्याने यंदा विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाही. ६० टक्के साठा अद्याप आलेला नाही. पुढील आठवड्यात काही प्रमाणावर पुस्तके येण्याची शक्यता आहे. त्याची आम्ही वाट पाहताेय. - चेतन मुथा, विक्रेता
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.