आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशास्त्रीय बांधकाम:श्रीकृष्ण कॉलनीत गटारी असूनही पावसाचे पाणी साचतेय रस्त्यावर; नागरिक वैतागले

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकृष्ण कॉलनीत गटारीचे अशास्त्रीय पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे. ही गटार उगमाकडे खोलगट तर शेवटी उंच झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. श्रीकृष्ण कॉलनीतील दोन्ही बाजूच्या गटारी येथील मोठ्या नाल्याला मिळतात. मात्र, या गटारीचे पाणी जाऊन मिळणाऱ्या गटारीपेक्षा उंच झाल्याने या पाण्याचा पूर्ण निचरा होत नाही. त्यामुळे संपूर्ण पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहतो. या गाळामुळे येथील नागरिकांना परिसरातून ये-जा करणे अवघड होते. तसेच येथील गटारीवरील ढापाही उंच नसल्याने पाणी वाहण्यास अडथळा येत आहे.

श्रीकृष्ण कॉलनीत पहिल्याच पावसात पालिकेच्या तयारीवर प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरात गटार उगमस्थानी खोल तर शेवटी उंच झाल्याने गटारीच्या पाण्याचा देखील निचरा होत नाही. त्यामुळे गटारीचा सर्व गाळ रस्त्यावर साचून नागरिकांना जाण्या-येण्यास व्यत्यय येतो. त्यामुळे या गटारींचे काम व्यवस्थित होणे गरजेचे आहे. ढापादेखील उंच नसल्याने पाणी वाहण्यास अडथळा येतो. तर मोठ्या नाल्यावर अनेकांनी ढापे टाकल्याने नालेसफाईला अडथळा येत असल्याने नालेसफाईदेखील करता येत नसल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहे. तसेच खुल्या भूखंडाचे कामही अपूर्ण सोडण्यात आले आहे.

गटारीवरील ढापा उंच व्हावा; अतिक्रमण काढावे
श्रीकृष्ण कॉलनीतील गटारीवरल ढापा उंच व्हावा. या ढाप्यामुळे गटारीतून सर्व बाजूने येणारे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येतो. तसेच मुख्य नाल्यावरदेखील झालेले अतिक्रमण व ढापे काढण्याची गरज आहे. या ढाप्यांमुळे नाल्याच्या सफाईला अडथळा येतो. तसेच येथील गटारीचीही नियमित सफाई होत नाही.- एन. आर. आडगावकर, श्रीकृष्ण कॉलनी

परिसरात सर्वच गटारी शास्त्रीय पद्धतीने होण्याची गरज
श्रीकृष्ण कॉलनीतील गटारी शास्त्रीय पद्धतीने होण्याची गरज आहे. या गटारी व्यवस्थित झालेल्या नसल्यानेच गटारीचे पाणी रस्त्यावर साचत आहे. पाणी साचल्यानंतर नागरिकांना रस्त्यावरून जाणे मुश्कील होते. तसेच येथे गाळ साचून राहत असल्याने दुर्गंधीही सुटते. अनेकदा गटारीचे पाणी बाथरूमच्या पाइपद्वारे घरापर्यंत येते.- प्रेमचंद राणे, श्रीकृष्ण कॉलनी

पहिल्याचे पावसाने साचला गाळ
गटारीच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पहिल्याच पावसात गटारी तुंबून गटारीचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा आला. रस्त्यावर गाळ पसरल्याने भरधाव वाहनांमुळे हा गाळ पादचाऱ्यांच्या अंगावरही उडत होता. पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी हा गाळ दोन्ही साइडला जमा केला. गटारींचे व्यवस्थित काम झाले नाही तर येथील नागरिकांना पावसाळ्याचे चार महिने हा त्रास सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल.- योगेश्वर जाधव, श्रीकृष्ण कॉलनी

बातम्या आणखी आहेत...