आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आयुर्वेद, होमिओपॅथी अभ्यासक्रमासाठी ४८० गुणांची परीक्षा; आयुषच्या प्रवेशासाठी १८ पर्यंत मुदत

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय शाखेच्या आयुष अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एनट्रान्स टेस्ट अर्थात एआयएपीजीईटी २०२२चे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून परीक्षेसाठी प्रविष्ट होता येणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांच्यातर्फे या परीक्षेचे संयोजन केले जाणार आहे. आयुष अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्धा, युनानी या शाखांच्या पदव्युत्तर प्रवेशासाठी ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर पार पडणार आहे. आयुर्वेद शाखेची परीक्षा इंग्रजी व हिंदीत देण्याची सुविधा उपलब्ध असेल. होमिओपॅथीची परीक्षा केवळ इंग्रजी माध्यमातून देता येईल. सिद्धाची परीक्षा ही इंग्रजी व तामीळ तर युनानी शाखेची परीक्षा इंग्रजी व उर्दू माध्यमातून देणार आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन माध्यमातून शुल्क अदा करण्यासाठी १९ ऑगस्टपर्यंतची मुदत असेल. ऑनलाइन स्वरूपात दाखल केलेल्या अर्जात दुरुस्तीसाठी २० ते २२ ऑगस्ट दरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दोन तासांची परीक्षा : प्रवेश परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे १२० प्रश्न विचारले जातील. ४८० गुणांसाठी होत असलेल्या परीक्षेत बरोबर उत्तरासाठी ४ गुण दिले जातील. तर चुकीच्या उत्तराला एका गुणाची कपात केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व बाबींचा काटेकोर अभ्यास करावा लागणार आहे. तसेच प्रत्येक विषयातील बारकावे लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करण्यावर भर द्यावा लागेल.

अकरावीच्या नियमित वर्गांना ८ पासून प्रारंभ
दहावीचे निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेशाला सुरुवात झाली असली तरी यंदा सीबीएसई बोर्डाचे निकाल उशिरा लागल्याने अद्याप प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. सध्या स्पॉट अॅडमिशन सुरू असून, येत्या ८ ऑगस्टपासून नियमित अकरावीचे वर्ग सुरू होणार असल्याचे महाविद्यालयांतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी मू. जे. महाविद्यालयात आयटी आणि व्होकेशनल विषयांसाठी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रियेला गती येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...