आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामैत्रिणीच्या ओळखीच्या महाविद्यालयीन तरुणाशी मैत्री करून नंतर त्यालाच महाविद्यालयाच्या आवारात चॉपरचा धाक दाखवून तीन महिन्यांपासून खंडणी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खंडणीखोराला अटक केली आहे.
जयदीप राजेंद्र कचवा (वय २२, मुळे रा. धाडरी, ता. धुळे, हल्ली रा. गांधीनगर) हा तरुण नूतन मराठा महाविद्यालयात एमएस्सी कॉम्प्युटरच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेतो आहे. सुनील प्रकाश खोंडे (रा. इंद्रप्रस्थनगर) हा त्याच्या मैत्रिणीचा मित्र आहे. या माध्यमातून जयदीप व सुनील यांच्यातही मैत्रीपूर्ण संबंध होते. दरम्यान, याचा गैरफायदा घेत सुनीलने तीन महिन्यांपूर्वी जयदीपला फोन करून ‘मला आत्ताच्या आत्ता फोन पे वर २०० रुपये सेंड कर, नाही तर तुझा आजच शॉर्ट करेल, जिवंत ठेवणार नाही’ अशा भाषेत धमकी दिली.
या वेळी जयदीपने पैसे पाठवले. जयदीप धमक्यांना भीत असल्याचे लक्षात आल्यानंतर सुनीलने गेल्या तीन महिन्यांपासून त्याला वेळोवेळी धमक्या दिल्या. महाविद्यालयाच्या आवारात चॉपरचा धाक दाखवून त्याच्या खिशातून पैसे काढून घेतले. तीन महिन्यांत पाच हजार रुपये त्याने जयदीपकडून उकळले आहेत. सुनीलचा त्रास अधिक वाढल्यामुळे अखेर जयदीपने सोमवारी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह पथकाने मध्यरात्रीच सुनीलला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध यापूर्वी देखील काही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.