आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:कौटुंबिक भांडणाने त्रस्त महिलेने घेतला गळफास ; महिला पतीपासून विभक्त राहत होती

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौटुंबिक भांडणातून त्रस्त असलेल्या एका महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली. महिला पतीपासून विभक्त राहत होती. पती तिला त्रास देत होता, त्यानेच घातपात केल्याचा संशय माहेरच्या लोकांनी व्यक्त केला. सुनीता शरद पाटील (वय ३२, रा. सत्यम पार्क) असे मृत महिलेचे नाव आहे.

घटना अशी की, सुनीता पाटील यांचे माहेर मनवेल (ता. यावल) येथील आहे. १५ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न पिंपळकोठा, रिंगणगाव येथील शरद पाटील यांच्याशी झाले. दरम्यान, सुरूवातीला पाटील दाम्पत्य सुरत येथे राहत होते. काही वर्षांनी ते पिंपळकोठा येथे निघुन आले. या दरम्यान, पती-पत्नीमध्ये विविध कारणांवरून वाद सुरू झाले होते. वाद विकोपाला गेल्यामुळे आठ वर्षांपूर्वी सुनीता ह्या पतीपासून विभक्त होऊन जळगावातील सत्यम पार्क येथे दोन्ही मुलांसह राहण्यासाठी आल्या. खासगी कंपनीत काम करुन त्या उदरनिर्वाह करत होत्या.

अधुन-मधुन त्यांचे पती घरी येऊन वाद घालत होते. याच वादातून २ मे रोजी सुनीता पाटील बाहेरगावी गेलेल्या असताना त्यांच्या पतीने घरी येऊन आग लावली. या आगीत घरातील दोन लाख रुपयांच्या वस्तू जळुन खाक झाल्या. गॅस सिलिंडर घेऊन गेले. दोन दिवसांपूर्वी शरद पाटील घरी येऊन मोठा मुलगा आयुष याला सोबत घेऊन गेले. तर शुक्रवारी रात्री लहान मुलगा वेदांत हा परिसरातच मामाच्या घरी गेला होता. त्रस्त सुनीता यांनी रात्री ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शनिवारी सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सायकर, वासुदेव मराठे, संजय भालेराव यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. यावेळी मृत सुनीता यांच्या माहेरच्या लोकांनी प्रचंड आक्रोश केला. पती शरद पाटील यानेच घातपात केल्याचा आरोप त्यांनी पोलिसांकडे केला.

बातम्या आणखी आहेत...