आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलक्रांती:‘मिशन 500 कोटी’द्वारे 34 गावांतील दुष्काळ हद्दपार, शेतीचे उत्पन्नही दुप्पट

जळगाव / विकास पाटील2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या गावात वर्षानुवर्षे पाण्याचे दुर्भिक्ष होते, दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत होते, जनावरांसाठी २०० ट्रक चारा बाहेरून विकत आणावा लागत होत्या, त्या चाळीसगाव तालुक्यातील धामणगावसह राज्यातील ३४ गावांमधील पाण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. ही सर्व गावे पाणीदार झाली, गावातून दुष्काळ हद्दपार झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. ही जलक्रांती केली आहे “मिशन ५०० कोटी जलसाठा’ या अभियानाने. २०१६ मध्ये राज्यात भीषण दुष्काळ पडला. नापिकीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पाण्यावाचून डोळ्यादेखत अनेक जनावरे तडफडून मेली. ही भयावह स्थिती पाहून चाळीसगावचे भूमिपुत्र तथा सहायक आयकर आयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण हळहळले. हे चित्र बदलण्यासाठी “मिशन ५०० कोटी जलसाठा’ हे अभियान ग्रामस्थ व सामाजिक संस्थांच्या मदतीने राबवण्यास प्रारंभ केला. सर्वप्रथम धामणगावात २०१७ मध्ये हा प्रयोग राबवला व तो यशस्वी झाल्याने राज्यभरात ४ वर्षांत ७० गावांमध्ये तो सुरू आहे. त्यापैकी ३४ गावांमधील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. हे अभियान पाहून जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंहही प्रभावित झाले. १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ३ दिवस ते चाळीसगावात मुक्कामी आले. गावशिवार पाहिले. हे अभियान गावागावात राबवल्यास गावांचे चित्र बदलेल, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

राज्यात ४ जिल्ह्यांत ३४ गावांमधील दुष्काळ हद्दपार
सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात हे अभियान राबवण्यात आले. एकूण १५० गावांपैकी १०० गावांमध्ये दुष्काळी स्थिती असते. हे अभियान राबवल्याने ४ वर्षांत २८ गावांचे चित्र पालटले. त्यामुळे राज्यभरातील अनेक गावांमध्ये हे अभियान राबवण्याची मागणी झाली. सातारा, आैरंगाबाद, उस्मानाबाद व जळगाव अशा ४ जिल्ह्यांत ७० गावांमध्ये हे काम सुरू आहे. आतापर्यंत ३४ गावे टंचाईमुक्त झाली असून ३६ गावांमध्ये कामे सुरू आहे.

जलसंधारणातून ५ पाटील बदलतात गावचे चित्र
जलक्रांती करण्यासाठी उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी १५ जणांची निवड केली. त्यांना ९ महिन्यांचे प्रशिक्षण दिले व ५ जणांना एका गावाची जबाबदारी दिली जाते. हे ५ पाटील स्वयंस्फूर्तीने काम करतात. कोणताही मोबदला घेत नाहीत. जलसंधारणाची माथा ते पायथ्यापर्यंत कामे ग्रामस्थांच्या मदतीने पावसाळ्यापूर्वी करतात व वर्षभरात गावाचा चेहरामोहरा बदलतात.

दुग्ध व मत्स्यव्यवसायाला आले चांगले दिवस, रब्बीलाही फायदा
प्रत्येक गावात ५ कोटी लिटर जलसाठा केल्याने दोन महिन्यांत भूजलपातळी उंचावते. ती इतकी की विहिरीतून बादलीने पाणी भरता येईल एवढी. वर्षभरातील ९ महिने नद्या वाहत्या झाल्या. खरिपाचा जेमतेम हंगाम घेणारे शेतकरी रब्बीचाही हंगाम घेऊ लागले. ज्या शेतकऱ्यांना चारा विकत घ्यावा लागायचा ते इतरांना विक्री करू लागले. दुग्ध व मत्स्य व्यवसाय सुरू झाला. गावातच रोजगार मिळू लागला असून स्थलांतरही कमी झाले.

काय आहे मिशन ५०० कोटी?
पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी फक्त ५ कोटी लिटर जलसाठा एका गावशिवारात केल्यास पाण्याचा प्रश्न मिटतो, हे लक्षात आल्याने उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी ५०० कोटी लिटर जलसाठा करण्याचे मिशन हाती घेतले. दुष्काळग्रस्त गावासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने पोक लेन उपलब्ध करून द्यायचे, डिझेलचा खर्च गावातील शेतकऱ्यांनी करायचा. त्यांना मोबदला म्हणून त्या शेतकऱ्यांची बांधबंदिस्ती, शेतरस्ता तयार करून द्यायचा, जेणेकरून त्यांच्याही विहिरीची भूजलपातळी वाढतेे.

२०८ कोटी जलसाठ्याचे उद्दिष्ट साध्य
चाळीसगाव तालुक्यातील २८ गावांमध्ये यश आल्याने आता राज्यभर ही जलदिंडी सुरू आहे. मिशन ५०० कोटींपैकी आतापर्यंत २०८ कोटी लिटर जलसाठ्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात व ४५ हजार वृक्ष जगवण्यात यश मिळाले आहे. ग्रामस्थ एकवटल्यास गावाचे चित्र बदलते. -उज्ज्वलकुमार चव्हाण, मिशन ५०० कोटींचे प्रणेते

बातम्या आणखी आहेत...