आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणाबाई चौधरी पुरस्कार जाहीर:महिला वैमानिकाचा जीव वाचवणाऱ्या विमलबाईंना पहिला बहिणाबाई पुरस्कार

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साडीची झोळी बनवून 3 किमी दूर रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी केली होती मदत

१६ जुलैचा तो दिवस. शिरपूर येथे विमान प्रशिक्षण केंद्रातील एक प्रशिक्षणार्थी विमान वर्डी शिवारात कोसळले. यात दुर्दैवाने वैमानिकाचा मृत्यू झाला आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक अंशिका गुर्जर जखमी झाली. ५० फूट खोल दरीत हे विमान कोसळल्याने अंशिकाला तेथून रुग्णालयात हलवायचे म्हटले तर रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. तेथे आिदवासी बांधव पोहोचले. यातील वर्डी (ता.चोपडा) येथील विमलबाई हिरामण भिल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मागचा-पुढचा विचार न करता अंगावरची साडी झोळी तयार करण्यासाठी दिली. या झोळीतूनच अंशिकाला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यात आले आणि वेळेवर उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले. यात विमलबाईंनी घालून दिलेला मानवतेचा आदर्श अनेकांच्या मनाला भिडला.

मानवतेचे प्रतीक ठरलेल्या या प्रसंगानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पहिला बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार विमलबाई भिल यांना जाहीर करण्यात आला आहे. ११ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार विमलबाई यांना प्रदान करण्यात येणार आहे. या विद्यापीठाच्या वतीने चालू वर्षापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. दरम्यान, १६ जुलै रोजी एमव्हीकेएम संस्थेअंतर्गत शिरपूर येथे सुरू असलेल्या विमान प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थी विमान चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात कोसळले.

दुर्गम भागात विमान कोसळल्यामुळे सुमारे तीन किलाेमीटर अंतरावर उभ्या रुग्णवाहिकेपर्यंत अंशिकाला तातडीने नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध नव्हते. विमलबाईंनी हे तत्काळ ओळखले. प्रसंगावधान राखून त्यांनी स्वत:च्या साडीची झोळी अंशिकाचे प्राण वाचवू शकते हे ताडले आणि मागचा-पुढचा विचार न करता साडी काढून दिली. यामुळे अंशिकाचे प्राण वाचले. प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

११ हजार रुपये रोख, सन्मानपत्र; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि साडी-चोळी देऊन हा पुरस्कार दिला जाणार आहे. या वेळी विमलबाई यांच्यासोबत अपघातस्थळी मदत करणाऱ्या ११ तरुणांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला जाईल. ११ ऑगस्टला विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्यानिमित्त होणाऱ्या कार्यगौरव पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...