आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन वर्षांपासून या ना त्या कारणामुळे रखडलेल्या भोईटेनगर उड्डाणपुलावरील ‘आर्म’च्या कामाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. यासाठी महारेलने उड्डाणपुलाच्या डिझाइनमध्येही बदल केला आहे. सहा पैकी पाच प्लॉट बाधित होणार आहेत. पुलापासून २२० मीटर लांबीचा व साडेआठ मीटर रुंदीचा हा मार्ग तयार केला जाणार आहे.
शहरातून जाणाऱ्या मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे लाइनवरून उभारण्यात येणाऱ्या रिंगरोडच्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू झाले आहे. शिवाजीनगरकडील भागाकडे पिलरचे काम सुरू केल्यानंतर रिंगरोडच्या बाजूनेही कामाला गती आली आहे. त्यामुळे पिंप्राळा गावाकडे जाण्यासाठी उड्डाणपुलावरून आर्मची निर्मिती करावी, अशी मागणी केली जात होती. गेल्या आठवड्यात माजी नगरसेवक संदेश भोईटे, भाजप कार्यकर्ते सागर पाटील व नागरिकांनी पालिका आयुक्तांची भेट घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पालिकेने तातडीने हालचाली करत आर्मच्या कामासाठी महारेलला ना-हरकत दिली आहे.
डिझाइनमध्ये केला बदल
उड्डाणपुलाच्या कामासाठी महारेलने डिझाइन तयार केले होते; परंतु आर्मच्या निर्मितीनंतर त्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेता महारेलने डिझाइनमध्ये बदल केले आहेत. पूल व आर्मच्या कामात सहा प्लॉटचा अडसर येत होता; परंतु डिझाइनमधील बदलामुळे पाच प्लॉट बाधित होणार आहेत. या पाचही प्लॉटसाठी भूसंपादन करावे लागणार आहे.
भिंतीला लागून उभारणी
उड्डाणपुलापासून सुरुवात होणाऱ्या आर्मची लांबी २२० मीटर तर रुंदी साडेआठ मीटर राहिल. रेल्वेगेट ते बजरंग बोगदा हा रस्ता १८ मीटर रुंदीचा आहे. त्यावर साडेआठ मीटर रुंदीचा आर्म उभारल्यानंतर उर्वरित रस्ता हा सर्व्हिसरोड राहणार आहे. रेल्वेच्या संरक्षण भिंतीला लागून हा मार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.