आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण:प्रशासन उत्तम करण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 9.30 वाजता पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपले प्रशासन उत्तम करण्यासाठी कटीबध्द राहिल, आपला जिल्हा, राज्य व देश मजबूत करण्यासाठी एकत्र येऊया,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, स्वातंत्र्यसैनिक व अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर त्यांच्या हस्ते तिरंगा फुगे हवेत सोडण्यात आले. त्यानंतर त्यांनी जिल्हावासीयांना उद्देशून संबोधित केले. गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानांतर्गत घरावर तिरंगा फडकवणाऱ्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले. पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ई-पीक पाहणी अभियानांतर्गत जिल्ह्यात 10 लाख 70 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पीक कर्ज, पीक गणना करणे सुलभ झाले आहे. ई-पीक पाहणी नोंदवणे आवश्यक आहे.

आत्महत्या थांबवण्यासाठी अभियान

संपूर्णपणे सातबारा ऑनलाईन झालेले आहेत. प्रलंबीत फेरफार निपटारा करण्यासाठी जिल्ह्यात धडक मोहिम राबवण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकरी संवेदना अभियान राबवण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 हजार 60 कोटी कर्जवाटप करण्यात आले. त्याची टक्केवारी एकूण उद्दिष्टाच्या 60 टक्के आहे. पंतप्रधान पीक विमा योजना 27 कोटीवर रक्कम कंपनीकडे भरण्यात आले.

नुकसान भरपाईची मागणी

1 लाख 4 हजार शेतकऱ्यांना 184 नुकसान भरपाई मिळाली आहे. जिल्ह्यात सरासरी 55 टक्के पाऊस झाला असून 96 टक्के पेरणी झालेली आहे. वाघूर धरणाच्या लाभक्षेत्रात हर खेत को पाणी योजनेंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. सात बलून बंधाऱ्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत सलग दुसऱ्या वर्षी शासनाने जिल्ह्याचा गौरव केला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांचा व पू्र्णत्वास आलेल्या योजनांचा आढावा घेतला.

मी सुद्धा चष्मा घातलाय

राज्य मंत्रिमंडळात खाते कमी जास्त, इकडे तिकडे झाले असतील. उंदराला सापडली चिंधी, इकडे ठेवू का तिकडे ठेवू एवढेच दिसतेय. मिळालेल्या खात्याबाबत शंभर टक्के समाधानी असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. राज्यमंत्रिमंडळाच्या खातेवाटपात भाजपचा वरचष्मा दिसून येत असल्याबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर मी सुध्दा चष्मा घातलाय, असे मिष्कील उत्तरही त्यांनी दिले.

सरकारची सामूहिक जबाबदारी

पुढे पाटील म्हणाले की, सेकंड इनिंग सुरू होत आहे. पूर्वी असलेले पाणी पुरवठा व स्वच्छता हेच खाते पुन्हा मिळाले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत 34 हजार गावांना पाणी पुरवण्याचा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतलेला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पाणी प्रश्न सोडविण्याचे काम हाती आले. त्याचा आनंद आहे. जामनेर येथील महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असताना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले. त्या प्रकरणाची चौकशी झालेली आहे. पतीच्या बाबतीत चौकशी झाली. जामनेर तालुक्यातील शेतकरी आहे. सर्व चौकशी झालेली असल्याचे त्यांनी सांगितले. खाटेवाटप कसे झाले, कुणाला दिले, यापेक्षा सरकारची सामूहिक जबाबदारी असते. पाणी पुरवठा मंत्री असलो तरी इतर खात्यांची जबाबदारी नाही का? मंत्र्यांची जबाबदारी राज्यातील प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते.

महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
स्वातंत्र्य दिनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री हे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणासाठी आलेले असताना जामनेर तालुक्यातील महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले. जामनेर येथील व्यापाऱ्याने शेतमाल खरेदीत पतीची फसवणूक केल्याचा आरोप त्या महिलेने केला. व्यापाऱ्याने शेतमाल खरेदी करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिलेला नाही. या प्रकरणात सबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिस प्रशासन व्यापाऱ्यांवर कारवाई करीत नसल्याचा आरोप त्या महिलेने केला. अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. मंत्री व प्रशासनाला प्रशासनाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा यावेळी त्या महिलेने व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...