आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडोक्यावर कर्ज वाढल्यामुळे दागिने घडवणाऱ्या एका कारगिराने मालकाकडून दोन लाख रुपये उसने मागितले. आधीची उसनवारी जास्त असलेल्या मालकाने हे पैसे द्यायला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या कारागिराने दुकानातीलच ३ लाख १४ हजार रुपयांचे सोने घेऊन पोबारा केला. त्यामुळे ५ लाख ७४ हजार रुपयांचा व्यापाऱ्याला फटका बसला आहे. या प्रकरणी कारागिरावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांपूर्वीच भंगाळे ज्वेलर्सची एका कारागिराने १४ लाखांची अशीच फसवणूक केली होती. या दोन्ही घटनांमुळे सराफ बाजारात खळबळ उडाली आहे.
अनेकांकडून घेतले पैसे
सुशांत तारकनाथ भुकता (वय ४२, रा. मारोतीपेठ) हे २५ वर्षांपासून जळगावात दागिने निर्मितीचा व्यवसाय करतात. मारोतीपेठेत त्यांचा कारखाना असून तेथे ७-८ कारागीर कामाला आहेत. आरोपी बापन मंटू कारक (वय २८, रा. पाकुडदाणा, पो. हरीरामपुर, पश्चिम बंगाल) हा देखील १५ वर्षांपासून त्यांच्याकडे दागिने घडवण्याचे काम करत होता. सोन्याचे व्यापारी दीपक संघवी यांच्याकडून बापन याने २५० ग्रॅम वजनाचे सोने दागिने घडवण्यासाठी घेतले होते. यातील अनेक दागिने घडवून संघवी यांना दिले. नंतर बापन याने भुकता यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपये उसने घेतले व गावी घर बांधण्यासाठी गेला. यावेळी त्याने अनेक जणांकडून उधार पैसे घेतले होते.
फसवणुकीचा गुन्हा दाखल
कर्जबाजारी झाल्यामुळे जळगावात आल्यावर त्याने पुन्हा मालक भुकता यांच्याकडे दोन लाख रुपये मागितले. परंतु, मागची उधारी न दिल्यामुळे यावेळी भुकता यांनी नकार दिला. ६ जून रोजी संघवी यांच्याकडील ६५ ग्रॅम वजनाचे ३ लाख १४ हजार रुपयांचे सोने घेऊन बापन जळगावातून बेपत्ता झाला. त्या दिवसापासून त्याचा मोबाइलही बंद आहे. बापन याने सोने व पैसे अशी ५ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भुकता यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून बापनच्या विरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.