आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान चार वर्षांपासून शहरातील निराधार वृद्धांना फूड व्हॅनच्या माध्यमातून दोन वेळचे जेवण पुरवत आहे. आता प्रतिष्ठान २७ जूनपासून फूड बँक सुरू करणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर हा स्टॉल राहणार आहे. दिवसभरात सुमारे १५० गरजूंना दोन वेळचे मोफत जेवण देण्याचा हा उपक्रम आहे. यात एका गरजू महिलेस रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान संचलित फूड बँकेच्या वतीने जळगाव शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात फूड बँक (बूथ) सुरू होणार आहे. त्यासाठी रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे. या फूड बूथच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रस्त्यावरील निराधार, अनाथ वृद्धांना दोन वेळचे जेवण मिळणार आहे.
प्रतिष्ठानचे धीरज जावळे, नकुल सोनवणे, सुलतान पटेल, गणेश देसले, शारदा सोनवणे, पूनम ताडे, धनंजय सोनवणे, सतीश जावळे व अविनाश जावळे यांच्या सहभागाने चार वर्षांपासून सुरू असलेल्या फूड व्हॅनसह आता फूड बँक सुरू होत आहे. उन्हाळा, पावसाळा असला तरी अविरतपणे व्हॅन गरजूंना अन्न पुरवत आहे. कोरोना काळातही जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने प्रतिष्ठानची फूड व्हॅन काम करत होती. जिल्हा पोलिस प्रशासन, जिल्हा न्यायाधीश संघ, डीवायएसपी सुनील कुराडे, श्रीराम पाटील, सुनील बाफना, जितेंद्र भंगाळे, प्रणेश ठाकूर यांच्यासह अनेक दात्यांच्या मदतीने हे काम सुरू आहे. वाढदिवस, यश-निवड, सेवानिवृत्ती, मुलांच्या जन्मावेळीदेखील नागरिक प्रतिष्ठानच्या मदतीने अन्नदान करत आहेत. ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात येणार आहे असे धीरज जावळे, उद्योजक श्रीराम पाटील यांनी सांगितले. लोकांना या उपक्रमाचा लाभ घेता यावा म्हणून सिव्हिल हॉस्पिटलसह इतर ठिकाणी फलक लावून माहिती दिली जाणार आहे. गरजूंना या उपक्रमाचा लाभ मिळावा, म्हणून जनजागृती केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.