आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​ड्रग्ज तस्करीविरोधात कठोर धोरण:जळगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती, गांजा लागवडीवरही ठेवणार लक्ष

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या वापरावर आळा घालून ही समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली एनकॉर्ड (नार्को काेऑर्डिनेशन सेंटर) ही समिती गठीत करण्यात आली आहे. समिती अंमली पदार्थांच्या तस्करीच्या नवीन पध्दतींबाबत गुप्तचर संस्था, यंत्रणेमार्फत माहिती प्राप्त करेल. जिल्ह्याच्या सीमेस लागून असलेल्या इतर राज्यांतील अंमली पदार्थांच्या प्रकरणांवरही समिती लक्ष ठेवणार आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. पोलिस अधीक्षक सदस्य सचिव तर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक, एनसीबीचे जिल्ह्यातील प्रतिनिधी, माध्यमिक शिक्षणाधिकारी हे समितीचे सदस्य आहेत. अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरावर आळा घालण्यासाठी व क्षेत्रीय स्तरावरील अंमली पदार्थांबाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एनकॉर्डची स्थापना करण्यात आली आहे.

गांजा लागवडीवरही लक्ष ठेवणार

जिल्ह्यात खसखस किंवा गांजा तत्सम अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर लागवडीवरही समिती लक्ष ठेवणार आहे. शाळा, महाविद्यालये या ठिकाणी अंमली पदार्थांच्या गैरवापराबाबत समिती जनजागृती करेल. बेकायदेशीर लागवडीमुळे बाधीत झालेल्या परिसरात एनडीपीएस कायद्यातील तरतुदीचे महत्व पटवून देणे व अंमली पदार्थांच्या हानीकारक प्रभावाबाबत समिती कार्यक्रम आयोजित करेल. अंमली पदार्थांची लागवड शोधण्यासाठी आवश्यक उपकरणांचे मूल्यांकन करेल आणि त्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करेल. जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्र व पुनर्वसन केंद्रांचेही समितीकडून पर्यवेक्षण करण्यात येईल. दर महिन्यात एकदा या समितीची बैठक होईल.

बातम्या आणखी आहेत...