आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • For The Debate 'Ravan Is Heavier Than Rama, But At The Root Is A Percentage; The Adjournment Took Place Before The Public Interest Decision Was Taken

​​​​​​​मनपा महासभा:वादासाठी ‘रामापेक्षाही रावण भारी, मुळाशी मात्र टक्केवारी ; जनहिताचे निर्णय होण्याआधीच झाली तहकूब

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांनंतर बुधवारी (दि. २१) होत असलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजेंड्यावरील विषयांना सुरुवात होण्याआधीच वातावरण इतके तापले की सभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. निमित्त ठरले उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे ‘रामापेक्षा रावण श्रेष्ठ आहे’ हे विधान. मात्र, या वादाच्या मुळाशी टक्केवारीचा मुद्दा असल्याचे त्या निमित्ताने झालेल्या आरोप प्रत्यारोपांवरून स्पष्ट झाले.

प्रभाग क्रमांक नऊमध्ये विकासकामे करण्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक ठेकेदारांना तयार करतो, पण एक पदाधिकारी मात्र, आपल्याला विचारल्याशिवाय कोणालाही निविदा फाॅर्म विकत द्यायच्या नाहीत, अशा सूचना अधिकाऱ्यांना देऊन ठेवतात. त्यामुळे कामे करायला कोणी तयार होत नाहीत, असा आरोप त्या प्रभागाचे नगरसेवक मयूर कापसे यांनी केला. त्यानंतर त्यांनी लिपिक राजेंद्र तायडे यांच्याशी फोनवर झालेल्या संवादाचे ध्वनिमुद्रण सभागृहाला ऐकवले. त्यात तायडे यांनी उपमहापौर पाटील यांनी तशा सूचना दिल्याचा उल्लेख होता. प्रशासनावर हा दबाव कोणत्या हेतूने आणला जातो आहे? असा अध्याहृत प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यावर विशिष्ट ठेकेदारच निविदा नेतात आणि ज्यादा दराने भरतात. त्या जास्तीच्या दराने मनपाचे नुकसान होते; पण फायदा कोणाला होतो? असा उपरोधिक प्रश्न उपमहापौर यांनी विचारला. या आरोप प्रत्यारोपात महाभारताचा आणि रामायणाचा उल्लेख आला. तेव्हा कुलभूषण पाटील म्हणाले की, रामापेक्षा रावण श्रेष्ठ होता हे विसरू नका.

त्यांच्या या विधानानंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी एकच हल्लकल्लोळ माजवला. रामचंद्रांचा अपमान करणाऱ्या उपमहापौरांना मंचावरून खाली उतरवा, असा आग्रह भाजपतर्फे लावून धरण्यात आला. काही नगरसेवक व्यासपीठाकडे येऊन आक्रमकपणे बालू लागले. त्यांना घेराव घालण्याच्या हालचली दिसताच हे वातावरण धोकादायक आहे हे लक्षात घेऊन कुलभूषण पाटील तिथून निघून गेेले व महापौर जयश्री महाजन यांनी सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी ज्या प्रमाणे हाणामारी झाली तसा प्रसंग टळला, असे काही नगरसेवक सांगत होते.

आज होणाऱ्या बैठकीत ठरेल भवितव्य : महापौर जयश्री महाजन यांनी गुरुवारी सर्व गटनेते आणि सर्वपक्षीय ज्येष्ठ नगरसेवकांची बैठक बाेलावी आहे. त्यात सर्व सहकार्य करणार असतील तर दाेन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

रामाच्या आस्थेपेक्षा उपमहापाैरांना डायसवर बसवणे हे महत्त्वाचे वाटते रामाच्या आस्थेपेक्षा उपमहापाैरांना डायसवर बसवणे सत्ताधाऱ्यांना महत्त्वाचे वाटते आहे. त्याच कारणासाठी अनिश्चित काळासाठी महासभा स्थगित केली आहे. विकास कामे रखडली असून, ते अनेक कामांचे प्रस्ताव सभेत निर्णयार्थ आहेत. म्हणून सभा पुन्हा सुरू हाेण्याची प्रतीक्षा करीत हाेताे. त्यासाठी तासभर सभागृहातून बाहेरही गेलाे नाहीत; परंतु सत्ताधाऱ्यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. - अॅड. शुचिता हाडा, नगरसेविका, भाजप.

सत्ताधाऱ्यांना श्रेय मिळू नये म्हणून गाेंधळ महासभेतील गाेंधळाचा विषय फार गंभीर नव्हता. उपमहापाैरांनी माहिती मागणे गैर नाही; मात्र गाेंधळ घालण्यामागे विकास कामे हाेऊ न देणे हाच हेतू आहे. महासभेत आज काेट्यवधी रुपयांची कामे हाेती. ती मंजूर झाल्यास त्याचे श्रेय सत्ताधाऱ्यांना मिळेल म्हणूनच हा गाेंधळ घातला गेला. - नितीन लढ्ढा, ज्येष्ठ नगरसेवक, शिवसेना. यासाठी उपमहापौर भाजपचे ‘लक्ष्य’ यावेळीही उपमहापौर कुलभूषण पाटील हेच सभागृहात भाजपचे लक्ष्य ठरले. त्यामागचे खरे कारण असे आहे की, एक तर त्यांनीच भाजपच्या नगरसेवकांना फोडून मनपातील भाजपची सत्ता घालवली. दुसरे कारण, सध्या ते येत्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. स्वत:च्या प्रभाग क्र. १० बरोबर ते आता प्रभाग नऊमध्येही विकासकामांवर आपला शिक्का मारू इच्छिताहेत. तिथे भाजपचे नगरसेवक सध्या आहेत. त्यामुळे भाजप त्यांच्या विरोधात आक्रमक होते आहे. कुलभूषण यांना वेळीच पायबंद घातला नाही तर ते अन्य प्रभागातही भाजपला डोकेदुखी निर्माण करतील, अशीही भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना वाटते आहे. त्यामुळेच संधी मिळेल त्या ठिकाणी त्यांना खिंडीत गाठायचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत.

७५ कोटींच्या कामांचे प्रस्ताव अधांतरीच या सर्वसाधारण सभेत शहरात करायच्या ७५ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. पण अजेंड्यावरील कामाला सुरुवात होण्याआधीच गोंधळ होऊन सभा अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यामुळे या विकास कामांच्या प्रस्तावांची मंजुरीही अधांतरीच राहीली आहे. यात नुकसान झाले आहे ते कर भरूनही विकासापासून वंचित असलेल्या जळगावातील सर्वसामान्य माणसांचे.

बातम्या आणखी आहेत...