आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:पाकिस्तानात प्रथमच साजरा हाेणार मराठी भाषा गाैरव दिन

जळगाव / विजय राजहंसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साताऱ्याचे दिलीप पुराणिक यांचे अडीच वर्षांपासून प्रयत्न, उद्या झूम अॅपवर पहिली ऑनलाइन मीटिंग

मराठी भाषेच्या प्रेमापाेटी ती शुद्ध बाेलली जावी, वापर वाढावा यासाठी सातारा येथील ६५ वर्षीय दिलीप पुराणिक यांच्या पुढाकाराने पाकिस्तानातील ५०० मराठी जनांनी मराठी भाषा संवर्धनाचा विडा उचलला आहे. त्यासाठी रविवारी पहिली झूम अॅपवर मीटिंग आयाेजित केली आहे. त्यात भारतातील ५०, पाकमधील ५० जण सहभागी हाेणार आहे. महिनाभर विविध स्पर्धांचे आयाेजन करून २७ फेब्रुवारीला मराठी भाषादिनी पाकिस्तानात बक्षीस वितरणही होणार आहे.

दिलीप पुराणिक यांना मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती. इतर देशांतील मराठी माणसांची काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, दुबई आदी देशांत संपर्क केला. त्यांनी सर्वप्रथम पाकिस्तानात मराठी भाषा संवर्धनाच्या प्रयत्नाचा निर्णय घेतला. येथे ५०० मराठी कुटुंबे असल्याची माहिती मिळाली. त्यांचे संपर्क क्रमांक मिळवले. यात विशाल राजपूत हा तरुण पुढे आला. त्याने येथील मराठी जनांची माेट बांधली. महाराष्ट्र-पाकिस्तान मराठी सेवा संघ नावाची संस्था स्थापन केली. येत्या रविवारी त्यांची मराठी सुधार कार्यक्रमाची पहिली आॅनलाइन मीटिंग हाेणार आहे.

हे आहेत प्रत्यत्नशील
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पुराणिक पितापुत्रांसह नानक जाधव, मनीष अग्रवाल, मंदार बगदाणी, प्रथमेश सरदेशमुख, पाकिस्तानातून श्री महाराष्ट्र पंचायतचे विशाल राजपूत, राजेश नाईक, प्रकाश गायकवाड, देवानंद सांडेकर, भाेसले, खरात, दुपटे आदी परिश्रम घेत आहेत.

पाकमध्ये मराठी संस्कृती
पाकिस्तानात मराठी कुटुंबांकडून मराठमाेळ्या संस्कृतीप्रमाणे, गाैरी-गणपती यासारखे सण साजरे होतात. महिला साड्या परिधान करतात. नथ, मंगळसूत्र घालतात. घरात माेदक, पुरणपाेळी आदी मराठी पदार्थ तयार करतात. राजेश नाईक या मूर्तिकाराने तयार केलेल्या मूर्तीची स्थापना येथे हाेते.

मराठीवर उर्दूचा प्रभाव, मराठीचा क्लास घेणार
सुमारे ७५ वर्षे येथे वास्तव्य असल्याने त्यांची मराठी भाषेशी नाळ काहीशी तुटलीय. त्यांच्या मराठी भाषेवर उर्दूचा प्रभाव अधिक आहे. येथील नवीन पिढीला शुद्ध मराठी शिकवण्यासाठी दर शनिवार व रविवारी स्वप्न स्टडीजच्या माध्यमातून इंटरनेटच्या साहाय्याने मराठी बाेलण्याचा व लिहिण्याचा क्लास सुरू होणार आहे. त्यासोबतच मराठी भाषा तिकडच्या मुलांनी शिकावी व मराठी संस्कृतीचे जतन करावे यासाठी अनेक मराठी पुस्तके, चार्ट, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जाेतिबा फुले आदी अनेक महामानवांची चरित्रे त्यांना पाठवली जाणार आहेत.

२७ एप्रिलला मराठी भाषा गाैरव दिन : पुराणिक यांचे लास्ट आेव्हर पब्लिकेशन, त्यांचा मुलगा स्वप्निल यांची स्वप्न स्टडीज आॅनलाइन एज्युकेशन व कराचीतील विशाल राजपूत यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र-पाकिस्तान मराठी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी राेजी कराचीतील मराठी समुदायासोबत मराठी भाषा गौरव दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करणार आहेत. तसेच कराचीत मराठी भाषेसंबंधी विविध प्रकारच्या स्पर्धा हाेणार आहेत.