आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Foreign Sightings At Reservoirs In Jalgaon; Foreign Parties Arrive In The District As The Cold Weather Increases; Observations From Bird Lovers

जळगावातील जलाशयांवर परदेशी पाहूणे:थंडीचा जोर वाढताच जिल्ह्यात परदेशी पक्षांचे आगमन; पक्षीप्रेमींकडून निरीक्षण

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंडीचा जोर वाढताच जिल्ह्यातील जलाशयांवर परदेशी, परराज्यीय पक्षांचा गोतावळा जमा झाला आहे. यात फ्लायकैचर्स, रोझफिंच, धोबी, कृष्ण थिरथिरा, तुतारी, वटवटे असे स्थलांतरित आहेत. तर अतिकडाक्याच्या थंडीमुळे, बर्फवृष्टीमुळे भारताच्या उत्तरेकडील प्रदेशात पाणवठे गोठतात, जमीन, झाडे बर्फाने आच्छादली जातात, त्यामुळे पक्षांना अन्न मिळवण्यासाठी तुलनेने उष्ण भागांकडे स्थलांतर करावे लागते.

यामुळेच दरवर्षी भारतात रशिया, सैबेरिया, मंगोलिया, यूरोप, चिन या देशांमधून देखील शाखारोही, चिखलपायटे, पाणपक्षी, शिकारी पक्षी मोठ्या संख्येने येत असतात. यंदा हतनुर, वाघुर, भोकरबारी, बहुळा, मेहरुण तलाव, मण्यारखेडा तलाव, हरताळा जलाशयांवर पाणपक्षी, चिखलपायटे, शिकारी पक्ष्यांचे आगमन झाललेे आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेचे पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, रविंद्र फालक, अमन गुजर, बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, वासुदेव वाढे, चेतन भावसार यांनी निरीक्षण करुन नोंदी घेतल्या आहेत.

भारतीय ठिपकेवाला गरुड

हा जागतिक स्तरावर संकटग्रस्त शिकारी पक्षी जिल्ह्यातील माळरानांवर आढळुन येतो आहे. गेल्या सहा वर्षापासुन नियमितपणे हिवाळ्यात शहरालगतच्या माळरानांवर दिसुन येत आहे. भारतीय ठिपकेवाला गरुडहा IUCN च्या रेड डेटा लिस्ट मध्ये vulnerable म्हणुन समाविष्ट आहे. हि जागतिक स्तरावर संकटग्रस्त पक्षी प्रजाती आहे.

डनलिन (जलरंक)

हा आपल्या भागात रशिया, आईसलँड, नॉर्वे अतिउत्तरेकडील भागातुन मध्यभारतात क्वचितच स्थलांतर करणारा चिखल पायटा पक्षी आहे. शहरालगतच्या जलाशयावर त्यांची एन्ट्री झाली आहे. हे पक्षी मोठ्या समुहात विशेष करुन समुद्र किनाऱ्यांवर आढळतात.

वाळवंटी रणगोजा

बलुचिस्तान, अफगाणिस्तान, इरान, तुर्कीस्तान, उत्तर-पश्चिमी मंगोलिया अशा वायव्येकडील प्रदेशांकडुन हा पक्षी हिवाळ्यात पाकिस्तान व भारतात स्थलांतर करतो. जलाशयांपाशी असलेल्या माळावर, काेरड्या नदीपात्रात किडे-किटक टिपताना दिसुन येतो.

काळ्या शेपटीचा पाणटिवळा

आईसलँड, रशिया अतिउत्तरेकडील भागांतुन हिवाळी स्थलांतर करणारा पाणटिवळा आपल्या लांब पल्ल्याच्या न थांबता करणाऱ्या उड्डाणांसाठी प्रसिद्ध आहे. IUCN च्या रेड डेटा लिस्ट मध्ये धोक्याजवळ पक्षी प्रजातींमध्ये समाविष्ट आहे.

या पक्षांचेही झाले दर्शन

शंकर(ब्लू थ्रोट), चित्रांग, वैष्णव, नयनसरी, गडवाल, लालसरी, मोठी लालसरी, शेंडी बदक, तलवार बदक, दलदल हारिण, ऑस्प्रे, लॉंग-लेग्ड बझर्डं , लिटिल स्टिंट, खरुची ससाणा, हिवाळी गप्पीदास, कबरा गप्पीदास, पिवळ्या डोक्याचा भारिट, काळ्या डोक्याचा भारिट, ग्रे-नेक्ड बंटींग, विविध प्रकारचे पिपिट्स आदी स्थलांतरित पक्षी आढळून आले.

बातम्या आणखी आहेत...