आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा करुनही मुजोरी:आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या वनअधिकाऱ्यांनाच लाकडी दांड्याने बेदम मारहाण, यावलमधील घटना

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृक्षतोड, लाकूड चोरी, शिकार अशा अनेक गुन्ह्यांचा आरोप असलेल्या संशयितांना पकडण्याठी गेलेल्या फॉरेस्ट गार्ड, वनविभागाचे अधिकारी यांनाच संशयित आरोपींनी लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली. यावल तालुक्यातील पैझरीपाडा या गावात ही घटना घडली. या प्रकरणी गुरुवारी पहाटे 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल वन परिक्षेत्रात चारमळी, मोहमांडली या भागातून सातत्याने लाकुड चोरी, शिकार होत असल्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकरणांमुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यात संशयित असलेले लोक पैझरीपाडा गावात राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी रात्री पथक पैझरीपाडा येथे पोहोचले होते.

दोघे गंभीर जखमी

पैझरीपाडा येथे अधिकारी पोहोचताच रंगी रामसिंग पावरा, सुरेश किसन पावरा, झामसिंग मखना बारेला, बिलरसिंग झामसिंग बारेला, प्यारसिंग झामसिंग बारेला, सखाराम झामसिंग बारेला, ईना कमरा बारेला, सिमा सखाराम बारेला, रशिदा झामसिंग बारेला, मंजुराबाई सुरेश बारेला, सावळीबाई कमरु बारेला, व्यापारीबाई तुळशीराम बारेला या 12 जणांनी वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. क्षणार्धातच यातील काही पुरूषांनी लाकडी दांड्यांनी पथकावर हल्ला चढवला. यात दोन जण गंभीर जखमी झाले.

तासभर गोंधळ

सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली. या प्रकरणी वनरक्षक कृष्णाा शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व 12 जणांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात मारहाण, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले तपास करीत आहेत.

जंगलांचे रक्षण करणे झाले अवघड

जिल्ह्यात यावल, वढोदा वनपरीक्षेत्रात चांगल्या प्रकारे जैवविविधता आहे. दुसरीकडे वन्यजीवांची शिकार, वृक्षतोडीचे प्रमाण वाढते आहे. अंधश्रद्धेपोटी शिकार केली जाते आहे. अशात वनांचे रक्षण करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवरदेखील हल्ले होत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...