आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळा:बीएचआरचा माजी अवसायक कंडारेला इंदूरमध्ये अटक; वेषांतर करून एका होस्टेलच्या इमारतीत होता लपला

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बनावट वेबसाइट तयार करून संस्थेच्या मालमत्ता कवडीमोल किमतीत विकल्या

भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात, बीएचआर बहुराज्य सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी पतसंस्थेचा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील इंदूर परिसरात पोलिसांच्या हाती लागला. दाढी, मिशी वाढवून रूप बदलवण्याचा प्रयत्न करूनही इंदूर परिसरातील एका जुनाट वसतिगृहाजवळ त्याला ओळखून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तो जिथे राहत होता तिथे काही महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली असून त्यांच्यासह बुधवारी त्याला पुण्याच्या विशेष न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे.

नोव्हेंबर २०२० च्या २४ तारखेला पुण्याच्या डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर २५ तारखेला पोलिसांनी जळगावमध्ये धरपकड केली होती. त्याची आधीच भनक लागल्याने जितेंद्र कंडारे आणि व्यावसायिक सुनील झंवर हे दोन प्रमुख संशयित आरोपी फरार झाले होते. तेव्हापासून पोलिस कंडारेच्या मागावर होते. त्याची सासुरवाडी इंदूरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यामुळे पुणे पोलिसांचे एक पथक तिथे लक्ष ठेवून होते. मध्यंतर कंडारे कुटुंबातील एक लग्नही इंदूरला झाले; पण तिथे हा संशयित आरोपी न आल्यामुळे पोलिसांच्या हाती लागला नाही.

तो इंदूरमधील एका होस्टेलमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पूर्ण खात्री केल्यानंतर सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याला पोलिसांनी पकडले. दुपारी आणि रात्री असे दोनच वेळा तो जेवणासाठी म्हणून त्या होस्टेलच्या इमारतीच्या खाली उतरत होता. काल रात्रीही तो जेवणासाठी म्हणून खाली आला आणि पोलिसांच्या हाती लागला. कंडारे याचे गेल्या सहा महिन्यांत वजन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यातच त्याने दाढीही वाढवली असून मिशाही वाढल्या आहेत. त्यामुळे त्याचे नोव्हेंबरमधले रूप पार पालटून गेले आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठीच त्याने हे रूपांतर करून घेतले होते.

अवसायन नव्हे, अवसानघात
जितेंद्र कंडारे याला सन २०१५ मध्ये पतसंस्थेचा अवसायक म्हणून नेमण्यात आले होते. त्यानंतर त्याने कर्जाची वसुली करून ठेवीदारांच्या ठेवी परत करणे अपेक्षित होते. मात्र, कर्जदार आणि दलाल यांना हाताशी धरून कंडारे याने आपल्या पदाचा आणि अधिकारांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला. कर्जाच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात ठेव पावत्या स्वीकारून बेकायदा व्यवहार केले. बनावट वेबसाइट तयार करून संस्थेच्या मालमत्ता कवडीमोल किमतीत विकल्या. त्यामुळे अनेक ठेवीदार देशोधडीला लागले.

बातम्या आणखी आहेत...