आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:ऊस तोड कामगार देण्याच्या नावाने ठेकेदाराची सहा लाखांत फसवणूक

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातील ऊस तोडण्यासाठी कामगार मिळवून देण्याचा बहाणा करीत चोपड्याच्या दोघांनी पुणे जिल्ह्यातील एका ठेकेदाराची 6 लाख 10 हजार रुपयात फसवणूक केली. या प्रकरणी शनिवारी अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी विश्वनाथ पवार (गलावांडी, ता. दौंड, पुणे) यांची फसवणूक झाली आहे. तर चोपडा तालुक्यातील विष्णापुर येथे राहणाऱ्या रामलाल किटकुल भिल व दीपक बुधा कोळी यांनी फसवणूक केली आहे.

घटना अशी की, विष्णापुर येथील काही मजुर दौंड जिल्ह्यात ऊसतोडीचे काम करतात. पाच-सहा वर्षांपूर्वी रामलाल व दीपक हे दोघे देखील दौंड येथे गेले होते. तेथे त्यांची ओळख ठेकेदार संभाजी पवार यांच्याशी झाली. या ओळखीचा फायदा घेत या दोघांनी चोपड्यातून पंधरा-वीस उसतोड कामगार मिळवून देतो असे आश्वासन पवार यांना दिले.

त्यानुसार 13 जून 2021 रोजी पवार यांच्याकडून सहा लाख 10 हजार रुपये अ‌ॅडव्हान्स घेतला. मजुर घेऊन येण्याचा बहाणा करुन दोघे चोपड्याला आले. यानंतर ते परत गेलेच नाही, ना त्यांनी मजुर पाठवले. पवार यांनी दोन-तीन महिने वाट पाहिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पवार स्वत: रामलाल व दीपक यांच्या गावी येऊन गेले. परंतु, दोघे जण बेपत्ता होते. अखेर त्यांनी शनिवारी अडावद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार जगदीश कोळंबे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...